बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण

359

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं तुम्ही बघितले असेल. मात्र, घराच्या बाहेर थांबू नका असे का म्हटले? म्हणून चक्क पोलिसांना मारहाण करण्यात आलीय. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावी ही घटना घडली. कोरोनाचं संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. यावेळी सिरसाळा पोलीस स्टेशनचे तीन पोलीस सीरसाळा शहरांमध्ये असलेल्या वडार कॉलनीमध्ये गस्त घालत होते. यावेळी घराच्या बाहेर का थांबलात? असे विचारल्यानंतर अशोक पवार याने पोलीसांवर लाकूड फेकून मारले. यानंतर पोलीस आणि दहा ते बारा आरोपी यांच्यात मारामारी सुरू झाली. यावेळी एकूण तीन पोलीस घटनास्थळी होते. त्या ठिकाणी वाद इतका वाढला की पोलिसांना आरोपीच्या कुटुंबीयांनी विटा आणि हाताने मारायला सुरुवात केली. यात पोलीस कॉन्स्टेबल किशोर घटमाळ यांच्या करंगळीला मार लागला. जवळपास अर्धा तास शिरसाळा मधल्या वडार कॉलनीमध्ये हा गदारोळ चालू होता. पोलीस कॉन्स्टेबल किशोर घाटमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण बारा जणांवरती गुन्हे दाखल झाले आहेत.

पाच आरोपींना अटक

या बारापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या आरोपींवरती एकूण आठ गुन्हे सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत. या 353, 332, 336, 143, 147, 149 व आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. या मारहाण प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे राम पवार, श्रीराम पवार व त्यांचे तीन मुले, दत्ता देवकर, अशोक पवार, विकास मिटकर, सोनाली पवार, अनिल जाधव, राम तुकाराम व त्यांची पत्नी यांचा समावेश आहे.

पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा

पोलिसांनी आपल्या हातातील काठीला आता तेल लावून ठेवा, त्याशिवाय विनाकारण घराबाहेर पडणारी टोळकी शांत बसणार नाहीत, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्यात. विनाकारण बाहेर हिंडणाऱ्या लोकांना एकप्रकारे सज्जड दमच अनिल देशमुख यांनी दिला आहे. राज्यात जमावबंदी असतानाही लोक गर्दी करत आहेत. त्यामुळेच नाईलाजाने संचारबंदी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखमुख यांनी दिली. मात्र, यापुढे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही ते म्हणाले.