15 व्या वित्त आयोग सदस्यांची लाईट हाऊस प्रकल्पास भेट

195

पुणे : स्वत:च्या कौशल्य विकासातून युवक व युवतींचे करिअर विषयक स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि त्यातून उपजीविकेचे साधन मिळवून आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांच्यावतीने महानगपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी लाईट हाऊस प्रकल्प राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगाचे सदस्य शक्तिकांता दास, डॉ.अशोक लहेरी, डॉ.अनुप सिंग, सचिव अरविंद मेहता यांनी आज औंध येथील लाईट हाऊस प्रकल्पाला भेट देऊन, तेथे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. महापौर मुक्ता टिळक, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पाची माहिती आयोगातील सदस्यांना देताना, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी, वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या युवक युवतींना, 20 दिवसांच्या फाऊंडेशन कोर्सद्वारे प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात येते, असे सांगितले. लॅपटॉप, व्हिडिओ वॉल यासारख्या साधनांचा वापर करतानाच प्रशिक्षणार्थ्यांमधील कौशल्य विकासाला चालना मिळेल अशा अभ्यासक्रमांचा समावेश प्रशिक्षणात केल्याचे त्यांनी सांगितले.

लाईट हाऊस प्रकल्पामध्ये चालू असलेल्या अभ्यासक्रमांची आणि नियोजित उपक्रमांची माहिती ऋची माथूर, गणेश नटराजन व अमृता बहुलेकर यांनी आयोगातील सदस्यांनी दिली. आयोगातील सदस्यांनी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून, प्रशिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलाविषयी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना डिजीटल तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या फिरत्या वाहनाची पाहणी आयोगाच्या सदस्यांनी केली.

महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त शितल उगले, सहायक आयुक्त संदीप कदम, नोडल अधिकारी गणेश सोनुने, तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थी व विद्यार्थींनी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.