महाराष्ट्रातही लवकरच राजकीय भूकंप

119

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सदस्यत्वाच राजीनामा दिल्याने मध्य प्रदेशात मोठा राजकीय भूकंप आला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच आता मध्य प्रदेशमधील पडसाद महाराष्ट्रात देखील उमटणार असल्याचे मोठं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

न्यूज 18च्या वृत्तानूसार रामदास आठवले म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदे हे मुळचे महाराष्ट्राचे असून मराठी भाषिक आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांची आजी देखील याआधी भाजपा पक्षात होती. त्यामुळे ज्योतिरादित्या शिंदे यांनी भाजपात प्रवेश करुन घरवापसी केली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपावर टीका करण्यात येत आहे. मात्र भाजपाने कोणत्याच प्रकारची फोडाफोडी केली नसल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटतील असं रामदास आठवले यांनी सांगितले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत आल्यास राज्यात मजबूत सरकार अस्तित्वात येईल. तसेच असं काही न घडल्यास लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षात बंडखोरी होईल असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा मोठा खुलासा देखील रामदास आठवले यांनी यावेळी केला.

दरम्यान, काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या तासाभराच्या बैठकीनंतर काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. तसेच, ज्योतिरादित्य शिंदे समर्थक 22 आमदारांनीही राजीनामे दिले आहेत.

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीही तातडीनं बैठक बोलावली आहे. त्यातच सकाळी मोदी आणि शहांच्या घेतलेल्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे भाजपा प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. 18 वर्षांचा प्रवास मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एक नवीन सुरुवात करायची आहे, असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले आहेत.