जडणघडणीत मातेचे, पत्नीचे योगदान महत्वाचे : शिवानी रागोळे

68

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व रोटरी क्लब ऑफ पूना डाऊन-टाऊनतर्फे महिलांचा सन्मान

पुणे : “कुटुंबाचा बहुतेक भार प्रत्येक महिला लीलया पेलत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रमाईंनी जशी खंबीर साथ दिली, तशीच खंबीर साथ प्रत्येक महिला आपल्या कुटुंबाला देत असते. महान व्यक्तींच्या जडणघडणीत मातांचे, पत्नीचे योगदान महत्वाचे असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालिकेत रमाईची भूमिका करताना खूप काही गोष्टी शिकले. त्यांच्याकडून मला नेहमी प्रोत्साहन मिळते,” असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत रमाईचे पात्र साकारणारी अभिनेत्री शिवानी रागोळे हिने केले. रमाईंचा त्याग आपल्या सगळ्यांना खूप शिकवतो, असेही तिने नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे आणि रोटरी क्लब ऑफ पुना डाऊन टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवसानिमित्त ‘सावित्रीमाई सन्मान’ पुरस्कार सोहळ्यात शिवानी रागोळे बोलत होती. बोपोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आयोजित या सोहळ्यात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदु कोडबील’ या विषयावर डॉ. निशा भंडारे यांचे व्याख्यान झाले. प्रसंगी अंतराळ अभ्यासिका लिना बोकील, दिनाझ तारापोरे, नगरसेविका सुनीता वाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती अध्यक्ष परशुराम वाडेकर, सरचिटणीस दीपक म्हस्के, अनिता ढोरे, कल्याणी मांडके, जॉलीदादा मोरे, लक्ष्मी शेवाळे आदी उपस्थित होते. रत्नमाला निकाळजे, श्रद्धा तांबे, शकुंतला बराटे, भीमाबाई जाधव, लता गायकवाड, नाझीम ढाले, ऍड शारदा वाडेकर, सीमा पाटील, प्रज्ञा वाघमारे यांना विविध क्षेत्रात उतुंग कार्य केल्याबद्दल ‘सावित्रीमाई सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच महिलांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित हजारो महिलांमधून लकी ड्रा काढण्यात आले आणि सोळा महिलांना पैठणी भेट देण्यात आली.

लिना बोकील म्हणाल्या, “आपल्या देशात असंख्य समस्या असतानाही आपला देश सुपरपॉवर आहे, कारण महान व्यक्ती घडवण्यात मातांचे मोठे योगदान राहिले आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे लाखो महिलांना शिक्षण घेता आले. आज अनेक महिला जागतिक पातळीवर विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. आई आणि सासूकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे मीही आज जागतिक पातळीवरील नासासारख्या संस्थेत काम करू शकत आहे.”

डॉ. निशा भंडारे म्हणाल्या, “हिंदू कोड बिल आणताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना स्वातंत्र्य देण्यावर भर दिला. त्यांना अनेक हक्क दिले. दोन पत्नीला विरोध, दत्तक विधान, घटस्फोट, महिलांचा सन्मान अश्या अनेक गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे आज महिला अभिमानाने जगत आहेत.” सुनीता वाडेकर म्हणाल्या, “अनेक मातांनी आपल्या मुलांना शिकवून डॉक्टर, अधिकारी, इंजिनियर बनवले आहे. त्यामुळे महिला आपल्या जीवनात किती महत्वपूर्ण भूमिका बजावते हे समजते. आज महिला घर संभाळण्यापासून नासा सारख्या मोठ्या संस्थेत काम करत आहेत.”

परशुराम वाडेकर म्हणाले, प्रत्येक स्त्रीला मुक्तपणे जगता आले पाहिजे त्यासाठी पुरुषांनी देखील त्यांना स्वतंत्र दिले पाहिजे. त्यांच्यावर निर्बंध घालू नयेत. त्यांना देखील समान हक्क आहेत. त्यामुळे आपणही त्याचा आदर, मान आणि सन्मान करत त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.” अनिता ढोरे यांनी शंख वादन केले. सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. आभार सुनीता वाडेकर यांनी मानले.