आयफोन बुकिंग रद्द करत महिला दिनानिमित्त या अभिनेत्याने घेतल्या पाच मुली दत्तक

2172

पुणे | प्रहार प्रतिनिधी

तरुण पिढीचे आयफोन वरील प्रेम सर्वश्रूत आहे.कलाकार देखील यात मागे नाहीत.’कॉमेडी तड़का’ व ‘रोल नंबर अठरा’ चित्रपट फेम अभिनेता सुभाष यादव ने त्याच्या व्हाट्स ऍप वर आयफ़ोन कंपनीचा नवीन मोबाइल बूक केल्याबाबत स्टेटस ठेवले होते.ते स्टेटस एका शिक्षिकेने पाहीले व काही अनाथ मुलींना आर्थिक मदत करून दत्तक घेण्यास सुचवले.जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सुभाषने फ़ोनचा बेत रद्द करून त्या पैशात संयुक्त स्त्री शैक्षणिक संस्थेच्या कै.श्री वसंतराव वैद्य प्रशाला राजेंद्रनगर,पुणे येथील पाच गरीब व अनाथ विद्यार्थिनींना दत्तक घेवून त्यांचे थकित शुल्क भरून पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

या शाळेत शिकणाऱ्या या मुलींच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व आर्थिक अडचणींमुळे त्यांना मागील काही वर्षांचे शैक्षणिक शुल्क भरणे शक्य झाले नव्हते, त्यामुळे त्यांचे शिक्षण थांबण्याची वेळ आली होती.या गोष्टीची कल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.जयश्री सदाशिव डांगे यांनी यादव यांना दिल्यावर त्यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घेत त्या विद्यार्थिनींचे थकित शुल्क भरून त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले तसेच यापुढील काळातील शैक्षणिक शुल्क,शैक्षणिक साहित्य,कपड़े व अभिनय प्रशिक्षण या गोष्टींची जबाबदारी यादव यांनी स्वीकारली आहे.

जगभर महिला दिन साजरा होत असताना एका मराठी अभिनेत्याने सामाजिक भान जपत विद्यार्थिनी दत्तक घेण्याचा उपक्रम राबवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा नीता रजपूत यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.यावेळी शशिकला शेंडे, वैशाली सर्जेराव, स्मिता निम्बर्गी या सहशिक्षिका उपस्थित होत्या.