समितीचे संस्कार आयुष्य जगायला शिकवणारे : संदीप कदम

252

माजी विद्यार्थी मेळाव्यातून आठवणींना उजाळा अन यशाचं कौतुक

पुणे, ता. २३ : वसतिगृहातील जुन्या आठवणी… केलेल्या कमवा व शिका, चार तास काम… सांस्कृतिक कार्यक्रमांत केलेली मौज मस्ती… वेगवेगळ्या क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचं कौतुक आणि आज करीत असलेल्या कामाची, मुलाबाळांची माहिती एकमेकांना सांगताना चेहर्‍यावरचा विलक्षण आनंद ओसंडून वाहत होता.

निमित्त होतं, विद्यार्थी साहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून सनदी अधिकारी संदीप कदम, उद्योजिका छाया राहाणे, संगणक अभियंता अनिल खेतमाळीस होते. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, दिनकर वैद्य उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना ज्येष्ठ कार्यकर्ते व कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्या रोहिणी डाके, भोजनालयातील मावशी गीता शिवशरण, देणगीदार पांडुरंग मेहेंदळे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यंदाच्या मेळाव्याचा खर्च अहमदनगर जिल्ह्यातील माजी विद्यार्थ्यांनी केला होता. जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी यंदाच्या मेळाव्याला हजेरी लावली.

प्रतापराव पवार म्हणाले, “अतिशय खडतर परिस्थितीतून शिकून समितीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. इस्रायलसारख्या देशात शिक्षणाबरोबरच उद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे तेथील मुले लवकर प्रगती करतात. हाच धागा पकडून आपण काम करावे. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी समितीत येऊन सध्याच्या विद्यार्थ्यांना उद्योजगतेचे प्रशिक्षण द्यावे. त्यासाठी बाहेरच्या तज्ज्ञ लोकांचीही मदत घेता येऊ शकते.”

संदीप कदम म्हणाले, “समितीमुळे अनेक मित्र भेटले. विद्यार्थीदशेत मिळालेले संस्कार, शिस्त जीवनाला वळण देणारी ठरली. स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागली. समितीत केलेले अनेक प्रयोग माझ्या कामात अमलात आणण्याचा प्रयत्न करतो. प्रशासकीय सेवा करताना आपण लोकाभिमुख व्हायला हवे. लोकसहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी समितीतील शिकवण उपयुक्त ठरते. आपल्याला जे मिळाले ते पुढील पिढीलाही तेच मिळत राहावे.”

छाया रहाणे म्हणाल्या, “समिती एक विचार प्रवाह आहे. समितीने अनेकांना उभे करण्याचे काम केले. अनेकांनी निस्वार्थी भावनेने काम करत आपल्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या अनेकांना घडवण्यात योगदान दिले. काम करताना समितीतले संस्कार ऊर्जा देतात. समिती आमच्या आयुष्याची गुरुकिल्ली झाली आहे. समितीचा हा कार्याचा वारसा माजी विद्यार्थी एक कार्यकर्ता म्हणून पुढे घेऊन जातील. हा विचारप्रवाह समाजात रुजविण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.”

अनिल खेतमाळीस म्हणाले, “प्रत्येकांनी आपल्या बरोबरच्या विद्यार्थ्यांना समितीशी जोडले जाईल, याचा प्रयत्न करावा.” तुकाराम गायकवाड यांनी समितीच्या कार्याविषयी माजी विद्यार्थ्यांना माहिती दिली. चंद्रकांत कुलकर्णी यांनी मंडळाच्या भावी उपक्रमांबद्दल माहिती दिली. डॉ. प्रसाद अंबीकर, सुनील चोरे यांनी सूत्रसंचालन केले. दिनकर वैद्य यांनी अहवाल वाचन केले. गणेश कळसकर यांनी आभार मानले.