देशाचा, खादीचा सन्मान करणारा ‘ला-क्लासे’ फॅशन शो : डॉ. नमिता कोहोक

113

सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोषाखांचे डिझाइन्स कौतुकास्पद

पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीतर्फे आयोजित ‘ल क्लासे’ फ़ॅशन शो नुकताच पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्राचा आणि खादीचा सन्मान वाढविण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर खादी : द नेशन्स प्राईड’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्स आणि मॉडेल्सनी केलेले त्याचे मनमोहक सादरीकरण यामुळे यंदाच्या ‘ला क्लासे’ फ़ॅशन शोने उपस्थितांची मने जिंकली. फॅशन शोचे हे नववे वर्ष होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण व्हावे, या उद्देशाने हा फॅशन शो आयोजिला जातो. यावेळी कर्करोगावर मात करीत सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या डॉ. नमिता कोहोक यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोषाखांचे डिझाईन्स कौतुकास्पद असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या फॅशन शो मधून देशाचा आणि खादीचा सन्मान झाला आहे, अशी भावना डॉ. कोहोक यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून आयोजिला जाणारा हा फ़ॅशन शो विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट डिझाईनर शोधण्यासाठी उपयुक्त आहे. व्यावसायिक स्वरुपाच्या फॅशन शोप्रमाणे त्याचे आयोजन केले होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या डिझाईन्स परिधान करुन अनेक प्रसिद्ध मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला. यंदा विद्यार्थ्यांनी ‘वॉक फॉर खादी’ या संकल्पनेवर काम केले होते. त्यातून खादीचा प्रवास उलगडला. ड्रेप्ड ड्रामा, खादी मेट्रिक, सायकेंडेलिक खादी, ड्युअल वर्ल्ड, फ्रेमिंग लव्ह, टेक्नो मोड, खाडीईजम या सात फेऱ्यांमध्ये हे सादरीकरण झाले. अनेक नामवंत कलाकारासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि हजारो विद्यार्थी पालकांनी या शोला उपस्थिती लावली. त्यामध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे राजेश पांडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, नगरसेवक किरण दगडे पाटील, शिवसेना शहर उपप्रमुख किरण साळी आदी मान्यवरांचा समावेश होता.

अलिशा राऊत, सोनल चौहान, अमानी सत्राला, प्रियाशा चौधरी आदी मॉडेल्सनी रॅम्पवॉक केला. मिसेस ग्लोबल युनाटेड विजेत्या डॉ. नमिता कोहोक यांनी परिधान केलेला विशेष पोशाख कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. प्रसिद्ध फॅशन डिझाइनर संदेश नवलाखा, निवेदक शिल्पा भेंडे, अनुजा शिंदे आणि सूर्यदत्ता संस्थेच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. युवा कोरिओग्राफर विशाल सावंत याने दिग्दर्शन केले.

‘फ्रेमिंग लव्ह’ला प्रथम क्रमांकाचे, तर ‘टेक्नो मोड’ला द्वितीय क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले. सायकेंडेलिक खादी संकल्पनेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. स्नेहल जैन हिला बेस्ट डिझाइनरचे बक्षीस मिळाले. खादी-इजम मध्ये स्नेहा रांजणे, ऋतुजा डोंबाळे, कादंबरी शिंपी, उन्मेषा खांडके,  फ्रेमिंग लव्हमध्ये पूजा येमपल्ले, मानसी पडवळ, साक्षी अटकळीकर, सायली आगे, ड्युअल वर्ल्डमध्ये याशी टिम्बडीया, योगिता भावेकर, रिया मोहन, टेक्नोमोडमध्ये  तर्जनी पटेल, शीतल नेवे, शुभम ताकवले, सायकेंडेलिक खादीमध्ये  नेहा सराफ, काजल परदेशी, स्नेहा पाटील, ड्रेप्ड ड्रामामध्ये स्नेहल जैन, खादी मॅट्रिकमध्ये अंकिता दीक्षित, अंकिता दासरवार, पूनम मोढवे यांनी कास्च्युमचे डिझाइन्स केले होते.

प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पर्यावरणपूरक आणि खादीपासून बनवलेल्या वस्तुंना प्रोत्साहन यातून मिळाले. खादीचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी सूर्यदत्ताचे विद्यार्थी प्रयत्न करतील. ”

प्रा. घोसपुरकर म्हणाल्या, “तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी जे शिकतात, अनुभवतात, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून त्यांना प्रोत्साहित करावे, हा या फ़ॅशन शोच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आभूषणांच्या, कपड्यांच्या डिझाइन्सचे दर्शन व्यावसायिक मॉडेल्स घडवितात. यातून डिझाईनर्सना अनेक संधी उपलब्ध होतात.” नुपूर पिट्टी यांनी फ़ॅशन शोचे निवेदन केले.