फडणवीस सरकारमुळे राज्याची आर्थिक शिस्त बिघडली : जयंत पाटील

249

‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या २०१७-१८ या वर्षांत विविध कामांसाठी केलेल्या ६५ हजार कोटींचा मेळ लागलेला नाही, असा ठपका ‘कॅग’ने आपल्या अहवालात ठेवला होता. त्यामुळे राज्याची आर्थिक शिस्त उद्ध्वस्त करण्याचे काम फडणवीस सरकारच्या कारकीर्दीत झाले आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केली होती.

त्यानंतर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीदेखील फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राने आपत्ती निवारणासाठी ७,८७४ कोटी रुपये मागील आर्थिक वर्षात खर्च केले होते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात राज्याचे बजेट ४३ हजार कोटींच्या तुटीत गेले आहे, अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून मिळणारा अपुरा निधी आणि फडणवीस सरकारने न झेपणाऱ्या योजना राबवल्याने राज्याची आर्थिक शिस्त बिघडली असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून मिळणारा ४५,०७७ कोटी रूपयांचा निधी अजूनही मिळालेला नाही. विविध करांद्वारे केंद्राकडून राज्याला मिळणारा हिस्सा, आपत्ती व्यवस्थापनाने केलेली मागणी आणि #जीएसटी कॉम्पेन्सेशन (क्षतीपूर्ती) या तीन गोष्टींमुळे केंद्राकडून राज्याला तब्बल ४५,०७७ कोटी येणे बाकी असल्याची माहिती मिळाली असल्याचे देखील मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.