‘आयसीएआय’तर्फे महिला लेखापालांसाठी दोन दिवसीय परिषद

158
पुणे : महिला लेखापालांच्या वैयक्तिक विकासासाठी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या (आयसीसीआय) पुणे व पिंपरी-चिंचवड विभाग आणि कमिटी फॉर कपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेम्बर्स इन प्रॅक्टिस यांच्या संयुक्त विद्यमाने महिला लेखापालांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ व २ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ९: ३० ते सायंकाळी ५:३० या वेळेमध्ये पुण्यातील बाणेर रस्त्यावरील यशदा प्रशिक्षण केंद्रामध्ये ही परिषद होणार आहे, अशी माहिती आयसीएआयच्या उपाध्यक्षा व परिषदेच्या प्रमुख समन्वयक सीए ऋता चितळे व सीए रेखा धामणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ऋता चितळे म्हणाल्या, “या परिषदेत सीए व्यवसायाशी संबंधित सर्व महत्वपूर्ण मुद्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यादरम्यान सीए व्यवसायाची नीतिमूल्ये, व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग व दुरुपयोग, विकसित होणारा सीए व्यवसाय अशा विभिन्न व महत्वपूर्ण विषयावर भर दिला जाणार आहे. या परिषदेला कमिटी फॉर कपॅसिटी बिल्डिंग ऑफ मेंबर्स ऑफ प्रॅक्टिस ऑफ आयसीसीआयचे अध्यक्षा सीए केमिशा सोनी, उपाध्यक्ष सीए निहार जांबुसरिया, आयसीएआय पुणेचे चेअरमन सीए आनंद जाखोटिया, सीए एस. बी. झावरे, सीए तरुण घिया, सीए अनिल भंडारी, सीए धीरजकुमार खंडेलवाल, सीए मंगेश किनारे आदी उपस्थित असणार आहेत.”
पहिल्या सत्रामध्ये सीएंच्या ‘नियमित लेखापरीक्षण ते न्यायवैद्यक लेखापरीक्षनाची बदलती भूमिका’, दुसऱ्या सत्रात मॉक ट्रिब्युनलस, सरावातील महत्वपूर्ण तंत्रज्ञान या विषयावर त्यात्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. महिला सदस्य आणि सीए फार्म यांच्यामध्ये सेवेदरम्यान निर्माण होणारी दरी कमी करण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. दुसऱ्या दिवशी संशोधन प्रबंध सादरीकरण करण्यात येईल. तसेच ‘जोखीम व्यवस्थापन’ या विषयावर सीए गुरुनंदन सानवल बोलणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करण्याऱ्या महिलाच्या चर्चा सत्राचे आयोजन व प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणाऱ्या महिलांचे सत्कार देखील करण्यात येणार आहेत, असे धामणकर यांनी नमूद केले.