झी सिनेमा’वर पाहा ‘ड्रीम गर्ल’चा ‘जागतिक टीव्ही प्रीमिअर’!

171

हजारों दिल, पर कनेक्शन सिर्फ एक!’  तुम्हालाही एखादे रोमँटिक पण विचित्र टेलिफोन कनेक्शन हवेसे वाटते आहे काय? मग शनिवार, 21 डिसेंबर रोजी आपले हृदयावर हात ठेवा कारण ‘#पूजादिलचोरहैं’ ही आपल्या मधाळ आवाजात तुमचे हृदय चोरण्याचा प्रयत्न करील. राज शांडिल्यचा ‘ड्रीम गर्ल’ हा एक परिपूर्ण विनोदी चित्रपट असून तो पाहताना प्रेक्षकांची हसून हसून मुरकुंडी वळेल. त्यातील करमवीर सिंह ऊर्फ पूजाची मध्यवर्ती भूमिका आयुष्यमान खुराणाने साकारली असून त्यात त्याने काढलेला महिलेचा आवाज सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या रोम-कॉममध्ये त्याच्या जोडीला नुसरत भरूचा, मनज्योत सिंग, अभिषेक बॅनर्जी आणि विजय राज हेही महत्तावाच्या भूमिकेत दिसतील. चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार भूमिका साकारीत असून आता तब्बल सात वर्षांनंतर आयुष्यमानच्या सोबत ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर हेही त्याच्या वडिलांच्या भूमिकेत असतील. ‘विकी डोनर’ चित्रपटानंतर हे दोन कलाकार प्रथमच एकत्र भूमिका साकारणार आहेत. अशा प्रकारच्या ‘ड्रीम गर्ल’ या एकमेव चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर ‘झी सिनेमा’ वाहिनीवर येत्या शनिवारी, 21 डिसेंबर रोजी रात्री 9.00 वाजता प्रसारित करण्यात येईल.

अमित गुप्ताचे राधा व कृष्णाच्या अमर प्रेमावर आधारित ‘राधे राधे’  हे गीत या चित्रपटाची संकल्पना स्पष्ट करते. तसेच मस्ती आणि रंजन यांचा मेळ साधणारे ‘दिल का टेलिफोन’  हे जोनिता गांधी आणि नक्काश अझीझ यांनी गायलेले गाणेही मजा आणते. ही दोन्ही गाणी तात्काळ लोकप्रिय बनली आहेत. यात आयुष्यमान खुराणा हा आपल्या पूजा आणि करम या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये सहज स्थित्यंतर करतो आणि आपल्या मुद्राभिनयाने तो अनेकविध भावनांचे प्रदर्शन करतो.

यातील पूजाची व्यक्तिरेखा साकार करण्यासाठी त्याने जी पूर्वतयारी करावी लागली, त्याबद्दल आयुष्यमान खुराणाने सांगितले, “या चित्रपटत मला माझे 25 टक्के संवाद बाईच्या आवाजात बोलायचे होते. मी पूर्वी रेडियोवर काम केलेलं असल्याने आवाजात बदल करण्याची मला सवय आहे. माइकसमोर दुसर्‍्यांच्या आवाजाची नक्कल करीत मी बरीच वर्षं काढली आहेत. जे लोक महिलांचा आवाज काढून इतरांची मस्करी करतात, अशा काही लोकांचे व्हिडिओ राजने मला दिले होते. मी ते व्हिडिओ बारकाईने अभ्यासले. यातील खरी मेख अशी होती की मला महिलेचा आवाज तर काढायचा होताच, पण त्यात हरयाणवी किंवा स्थानिक भाषेचा हेलही येणं अपेक्षित होतं. एक पुरुष असल्याने माझा आवाज तसा घोगरा आहे. त्यामुळे बाईचा आवाज काढणं हेच आधी एक आव्हान होतं. तसंच थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळ्या बोलीत बोलणं हेही आव्हान होतं. पण त्यामुळे मी थकून गेलो नाही. मला वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकार करायला आवडतात. त्यामुळे हेही माझ्यासाठी नवं साहस होतं.”

चित्रपटाची कथा मिश्किल स्वभावाच्या पण गुणी करमभोवती फिरते. करम नोकरीच्या शोधात असतो कारण त्याला त्याच्या वडिलांचे कर्ज फेडायचे असते. एके दिवशी त्याला एक नोकरीची जाहिरात दिसते, पण ती एका फ्रेंडशिप कॉल सेंटरची असते. ज्यावर एकाकी पुरुषांना त्यांच्या मनाजोगत्या महिलेशी काही काळ गप्पा मारता येतील. तो त्याच्या मालकाला फोन करतो आणि त्याच्याशी महिलेच्या आवाजात फोनवरून बोलतो. आपले नाव पूजा असल्याचे तो भासवितो. त्यामुळे त्याला नोकरी मिळते. लवकरच पूजाच्या मधाळ आवाजावर अनेक पुरुष फिदा होतात. त्यात एक पोलिस अधिकारी (विजय राज), एक कुमारवयीन मुलगा (राज भन्साळी) आणि एक ब्रह्मचारी (अभिषेक बॅनर्जी) यांचा समावेश असतो. या तिघांच्या दृष्टीने पूजा ही त्यांची ड्रीम गर्ल बनते. पण करम इकडे माही राजपूत (नुसरत भरूचा) हिच्या प्रेमात पडतो. माहीला मात्र करमच्या या ‘पूजा अवतारा’ची काहीच कल्पना नसते.