पुणे पालिकेच्या कै. चंदूमामा सोनावणे प्रसूति रुग्णालयात आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह

163

पुणे : पालिकेच्या कै. चंदूमामा सोनावणे प्रसूतिगृहामध्ये आणखी एक महिला कोरोना संक्रमित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला दोन दिवसांपूर्वीच प्रसूत झाली असून तिला पुढील उपचारांसाठी भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोनच दिवसांपूर्वी याच रुग्णालयात पाच महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेला कोरोना झाल्याचे समोर आले होते.

भवानी पेठेमध्ये पंडित नेहरू रस्त्यावर हे सोनावणे प्रसूतिगृह आहे. आसपासच्या वस्ती विभागासह शहरभरातून महिला उपचारांसाठी आणि प्रसूतिकरिता येथे येत असतात. याठिकाणी उपचारांसाठी पाच महिन्यांची महिला उपचारासाठी दाखल झाली होती. तिला सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसत असल्यामुळे डॉक्टर्स व सहकारी यांनी तपासणी केली. या तपासणीमध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यावर तिला पुढील उपचारांकरिता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर भारती हॉस्पिटलमध्ये व उपचारार्थ दाखल करण्यात आले.

त्यानंतर सोनवणे हॉस्पिटलमधील ३ निवासी डॉक्टर्स, ९नर्सेस, १ आया, २ नर्सिंग ऑर्डरली व २ अन्य कर्मचारी अशा एकूण १७ कर्मचाऱ्यांना दक्षता म्हणून विलगीकरण करण्यात आले. त्यानंतर आणखी एक महिला मंगळवारी पॉझिटिव्ह आली. दोन दिवसांपूर्वी प्रसूत झालेल्या महिलेला कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने तिच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

या महिलेला उपचारांसाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सलग दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने येथील डॉक्टर आणि कर्मचारी मात्र हवालदिल झाले आहेत.

सोनावणे रुग्णालयातील महिलांची प्रसूती व नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात प्रवेश बंद करण्यात आले आहेत. रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचारी यांचे साहाय्याने या रुग्णालयातील फक्त बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवण्यात आली आहे. या रुग्णालयात येणा?्या गर्भवती स्त्री व नवजात बालक यांना तपासणी व उपचाराकरिता मनपाच्या कमला नेहरू रुग्णालयात अथवा येरवडा येथील स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी रुग्णालयात जाण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.