इलेक्ट्रॉनिका फायनान्सने व्यवसायवृद्धीसाठी उभारला १०० कोटी रुपयांचा निधी

284

एन्करेज कॅपिटल ला समभाग विक्री; लघु-मध्यम उद्योगांना सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी अर्थसाह्य पुरवणार

पुणे | मध्यम आणि लघु उद्योगांना यंत्रसामुग्रीची खरेदी आणि इतर भांडवली खर्च यांसाठी अर्थसाह्य करण्याच्या व्यवसायात १९९० पासून कार्यरत असलेल्या, पुण्याच्या इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड ने निश्चित परिवर्तनीय प्रेफरन्स शेअर विक्री करून १०० कोटी रुपये (१.५ कोटी डॉलर )निधी उभारला आहे. सध्याच्या व्यवसायाचा विस्तार आणि लघु आणि मध्यम उद्योगांना छतावर उभारण्याच्या  सौर ऊर्जा यंत्रणा खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य यासाठी या निधीचा विनियोग होईल.

व्यापक समाजहिताच्या उद्देशाने केल्या जाणा-या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करणासाठी भांडवल उभारणा-या न्यूयॉर्क येथील एन्करेज कॅपिटल या कंपनीने तिच्या एन्करेज सोलर फायनान्स एलपी या निधीमार्फत इलेक्ट्रॉनिका फायनान्स मध्ये गुंतवणूक केली आहे. जागतिक बँकेचे माजी अध्यक्ष जेम्स वुल्फन्सन यांनी स्थापन केलेली वुल्फन्सन फंड मॅनेजमेंट आणि इकेओ असेट मॅनेजमेंट यांनी एन्करेज कॅपिटल ची स्थापना केली आहे. या व्यवहारात एडलवाइज फिनान्शिअल सर्व्हिसेस इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून सहभागी होते.

या व्यवहाराबद्दल इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड च्या व्यवस्थापकीय संचालक शिल्पा पोफळे म्हणाल्या, ” इएफएल चा व्यवसाय झपाट्याने वाढत असून, लघु आणि मध्यम उद्योग यावर आमचा विशेष भर आहे. रोजगार निर्मितीची मोठी क्षमता असूनही या क्षेत्राला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वित्तसाह्य मिळवणे ही यातील एक समस्या आहे. या व्यवहारात कंपनीला मिळालेल्या निधीमुळे आम्ही लघु अनु मध्यम उद्योगांना आमच्या विविध योजनांद्वारे अधिक ताकदीने अर्थसाह्य करू शकू. छतावर उभारण्याच्या सौर उर्जा यंत्रणांसाठी लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसाह्य करण्याच्या आमच्या नव्या व्यवसायासाठीही आम्हाला त्यातून निधी उपलब्ध होईल. एन्करेज कॅपिटल कडे वित्तीय समावेशन तसेच पर्यावरण रक्षक ऊर्जा आणि इतर पर्यावरण रक्षक उद्योगांना अर्थसाह्य करण्याचा दीर्घ अनुभव आहे. आम्हा दोघांचे व्यावसायिक संबंध दीर्घकाळ टिकून राहतील अशी आम्हाला आशा आहे.”

एन्करेज कॅपिटल च्या हवामान संवर्धन आणि वित्तीय समावेशन व्यवसायाचे सह-प्रमुख श्री अमेय बिजूर म्हणाले, ” इएफएल ने गेली ३० वर्षे लघु आणि मध्यम उद्योगांना कल्पक वित्तसाह्य योजनांद्वारे उत्तेजन देऊन आपले स्थान सिद्ध केले आहे. या क्षेत्रातील व्यवसायांना ऊर्जेचा कार्यक्षम वापर करणारी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, कारखान्यासाठी जागा विकत घेण्यासाठी तसेच पर्यावरण रक्षक ऊर्जानिर्मितीसाठी गरजेनुसार अर्थसाह्य करण्याची क्षमता कंपनीने निर्माण केली आहे. इएफएल चा पहिला संस्थात्मक भागीदार होण्यात आम्हाला आनंद आहे आणि छतावर उभारण्याच्या सौर उर्जा यंत्रणांसाठी लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसाह्य करण्याच्या इएफएल च्या नव्या व्यवसायात आम्ही उत्साहाने सहभागी होत आहोत.”

गेली अनेक वर्षे इएफएल ने लघु-मध्यम उद्योगांना अर्थसाह्य करणारी संस्था म्हणून स्थिर गतीने प्रगती केली आहे. या व्यवसायातील दीर्घ अनुभव, स्थैर्य आणि सखोल ज्ञान या आधारावर कंपनीने सूक्ष्म उद्योगांना तारणावर कर्ज देण्यास सुरुवात केली आहे.  आजवर कंपनीने ७५०० ग्राहकांना सेवा पुरविली आहे आणि भारतात १५ राज्यात ५५ शाखा आणि ४५० कर्मचारी अशी कंपनीची यंत्रणा आहे. कंपनीने दिलेल्या कर्जाची रक्कम १३५० कोटी रुपये आहे. एखाद्या व्यवसायाचा सर्वांगीण अभ्यास करून यंत्र खरेदी कर्ज, व्यापार कर्ज, सूक्ष्म उद्योगाना तारणावर आधारित कर्जे अशा धोरणाचा कंपनीने अवलंब केला आहे.  अलीकडेच, एप्रिल २०१९ मध्ये कंपनीने एका हवामान संवर्धन अर्थसाह्य निधीबरोबर करार करून १ कोटी डॉलर चे पर्यावरण रक्षण मसाला रोखे बाजारात आणले आहेत.