एटीएम फोडण्याच्या प्रयत्नातील दोघेजण जेरबंद

कुरुळी येथील प्रकार : दोघेजण फरार : एकुण २७ लाख रुपये वाचविण्यात यश

चाकण : रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना एटीएम फोडण्याच्या प्रयत्नातील दोघांना पाठलाग करून जेरबंद करण्यात यश आले असून, यातील अन्य दोन भामटे पोलिसांना गुंगारा देवून रातोरात फरार झाल्याचा धककादायक प्रकार पुणे – नाशिक महामार्गावरील कुरुळी ( ता. खेड ) गावच्या हद्दीत मंगळवारी ( दि. ९ ऑक्टोबर ) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आला आहे. या प्रकरणात भामट्यांनी कुरुळी येथील एक्सेस बँकेचे एटीएम फोडण्यासाठी चोरून आणलेल्या एका दुचाकीसह, दोन लोखंडी पहारी व सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपले चेहरे दिसू नयेत, यासाठी वापरला जाणारा स्प्रे येथील पोलिसांनी जप्त केला आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांमुळे या बँकेच्या एटीएम मधील एकुण २७ लाख रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींवर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात किरकोळ स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.      

चेतन शिवाजी राऊत ( वय – २५ वर्षे, रा.बलुतआळी, चाकण, ता. खेड,) व गणेश प्रकाश नाईक ( वय – २० वर्षे, रा. भुजबळ आळी, चाकण,), अशी जेरबंद करण्यात आलेल्या दोन भामट्यांची नावे आहेत. तर अन्य दोघेजण ( नाव, गाव, पूर्ण पत्ता समजला नाही.) पोलिसांना गुंगारा देवून रातोरात फरारी झाल्याने त्यांच्या शोधासाठी येथील पोलिसांची पथके सर्वत्र रवाना करण्यात आली आहेत. एक्सेस बँकेचे वरिष्ठ अधिकारी विनायक तुकाराम केंजळे ( वय – २८ वर्षे, रा. भोसरी, ता. हवेली,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे – नाशिक महामार्गावर कुरुळी ( ता. खेड ) गावच्या हद्दीत मंगळवारी ( दि. ९ ऑक्टोबर ) पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर व त्यांचे अन्य सहकारी रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी कुरुळी हद्दीत गस्त घालत असताना त्यांना येथील एक्सेस बँकेच्या एटीएम जवळ काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या.  त्यामुळे त्यांनी आपल्या ताब्यातील पोलीस वाहन सबंधित एटीएम समोर नेवून थांबविले. त्यावेळी गाडीची चमकलेली लाईट पाहून वरील चोरटे एटीएमच्या बाहेर येवून पळून जावू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून चेतन राऊत व गणेश नाईक यांना झडप टाकून ताब्यात घेतले.

चेतन व गणेश यांनी या प्रकरणात वापरलेली चोरीची करीझमा दुचाकी ( क्र. एम.एच. १४, डी.व्ही.०३४९ ) या गाडीसह एटीएम मधील दोन लोखंडी पहारी व सीसीटीव्ही वर आपले चेहरे दिसू नयेत, यासाठी मारण्यात येणारा स्प्रे जप्त केला आहे. वरील दोघांवर चाकण पोलिसांनी गु.र.नं. ९२६/२०१८ नुसार, भा.द.वि.कलम ४५७, ३८०, ५११, ४२७, ३४ प्रमाणे धाडसी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गस्तीमुळे एटीएम मधील तब्बल एकुण २७ लाख रुपये वाचले आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे, विक्रम पासलकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सातकर, नवनाथ खेडकर व ग्रामसुरक्षा दलातील कर्मचारी दिनेश सांगडे, भास्कर कठारे यांनी या प्रकरणातील भामट्याना पकडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

गेल्या अनेक महिन्यांपासून या टोळीने चाकण उद्योग पंढरीत चांगलाच धुमाकूळ घातला असल्याची चर्चा खुद्द पोलीस वर्तुळात सुरु आहे. रस्त्याने निर्जन भागातून जाणाऱ्या वाहन चालकांना अडवून दमदाटी करून त्यांना त्रास देण्याचा यांचा उद्योग असल्याचे बोलले जात आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.      

दरम्यान, चाकण भागात वाढती कारखानदारी, बेरोजगारीचे प्रमाण, परप्रांतीयांचे आक्रमण, ठेकेदारीतून वाढलेला संघर्ष आणि त्यातून मिळणारी आर्थिक माया, लुटमार, खून, मारामाऱ्या, धाडसी दरोडे आदींमुळे चाकण उद्योग पंढरीचे नाव साध्या सर्वत्र गाजत आहे. हे सर्व रोखण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याची नितांत गरज आहे.”

error: Content is protected !!