सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार जी. के. ऐनापुरे यांची निवड

पुणे : विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ कथाकार व कादंबरीकार जी. के. ऐनापुरे, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कादंबरीकार किरण नगरकर यांची निवड करण्यात आली आहे. दि. 20 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हे संमेलन होत आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जी. के. ऐनापुरे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. गुरुवार, दि. 14 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी 12.30 वाजता पत्रकारभवन, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे येथे हा सत्कार समारंभ होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे प्रमुख संयोजक व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिली आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, “साहित्य-संस्कृतीतून तयार होणार्‍या जनमानसाला व्यापक परिवर्तनवादी दृष्टी लाभावी. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय या तत्वांबरोबर लोकशाही समाजवादी मूल्य रूजावीत, या हेतूने 2010 पासून सम्यक साहित्य संमेलन भरविले जात आहे. हे संमेलन वाचक, साहित्यिक व विचारवंतांना जोडणारे विचारपीठ आहे. पाच दिवसांच्या या संमेलनात संविधान दिंडी, विविध विषयांवर परिसंवाद, शाहीरी जलसे, रॅप म्युझिक, नाटके व कवी संमेलने, स्वतंत्र ग्रंथदालन, यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार वितरण होणार आहे. यंदा हा पुरस्कार डॉ. गेल अ‍ॅमवेट यांना डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.”

या संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमळकर, उप-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, संमेलनाचे माजी अध्यक्ष यशवंत मनोहर, सुधाकर गायकवाड, डॉ. विजय खरे, डॉ. अनिल सपकाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. धर्मराज निमसरकर, राजाभाऊ भैलुमे, किरण सुरवसे, दीपक म्हस्के, निशा भंडारे, अमरनाथ आदी कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेत असल्याचे परशुराम वाडेकर यांनी नमूद केले.

error: Content is protected !!