२१ मार्चपासून ७० एम एमवर रंगणार ‘सूर सपाटा’

‘सूर सपाटा’ धुरळा उडवण्यास सज्ज

कबड्डी… कबड्डी… कबड्डी… म्हणत मनाचा ठाव घेणारा ‘सूर सपाटा’चा ट्रेलर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असून हिंदी सिनेसृष्टीतील दिग्ग्जही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. हिंदी-मराठीतील तब्ब्ल २५ प्रतिभावान कलाकारांच्या सहज अभिनयाने साकारलेल्या ‘सूर सपाटा’ची निर्मित लाडे ब्रोज फिल्म्स प्रा. लि. निर्मितीसंस्थेच्या निर्माते जयंत लाडे यांनी केली आहे. मंगेश कंठाळे दिग्दर्शित ‘सूर सपाटा’ या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांना चित्रपटगृहांपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरेल यात काही शंका नाही. लवकरच म्हणजेच होळीच्या निमित्ताने २१ मार्चला ‘सूर सपाटा’च्या रंगात सारी चित्रपटसृष्टी न्हाऊन निघणार आहे.

आपल्या मातीतल्या खेळांची आठवण करून देणारा कबड्डी हा खेळ ७० एम एमवर पाहणं रंजक ठरेल. ‘सूर सपाटा’ आपल्याला अशीच एका आठवणीतल्या खेळासोबतच शालेय जीवनातलं उनाडपणाची गोष्ट उलगडून दाखवणार आहे. उनाड पण कुशल विद्यार्थ्यांभोवती गुंफलेली ‘सूर सपाटा’ची कथा प्रेक्षकांची उत्कंठा टप्प्या-टप्प्याने वाढवत राहते. जिल्हा परिषदेच्या शाळेतील काही सामान्य विद्यार्थ्यांतील असामान्य कौशल्य जाणून त्यांना स्पर्धेमध्ये उतरवू पाहणारे शिक्षक एकीकडे तर आपणही एखादं मैदान मारू शकतो याची जाणीव झालेले विद्यार्थी दुसरीकडे. या दोघांमधला सुवर्णमध्य साधणारा ‘सूर सपाटा’ प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची एक संधी मिळाली तर तो त्याचं कसं सोनं करू शकतो हे दाखवतो.

ईगल आय एंटरटेन्मेन्टचे प्रकाश नाथन, हिमांशू अशर, संजय पतौडीया, अर्शद खान प्रस्तुत किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित ‘सूर सपाटा’मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के, शरयू सोनावणे, निनाद तांबावडे आदींसोबत हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव, उपेंद्र लिमये, लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे आणि नेहा शितोळे यांच्याही प्रमुख भूमिका असणार असून इतर कलाकारांची नावे या ट्रेलरमधून आपणास उमगणार आहेत. या चित्रपटाची कथा मंगेश कंठाळे यांची असून पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांची आहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांच्या लेन्समधून चित्रित करण्यात आला असून या चित्रपटात विविध जॉनरची धमाकेदार गाणी आपल्याला ऐकायला-पाहायला मिळतील. आदर्श शिंदे, प्रियांका बर्वे, अभिजित सावंत, जसराज जोशी, अभिनय जगताप आदी गायकांनी आपल्या सुमधुर आवाज दिला असून अभिनय जगतापचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.

error: Content is protected !!