सोनल बोत्रे यांच्या विरोधातील तक्रार अर्ज फेटाळला

नागरिकांनी पाहिला हाय होलटेज ड्रामा : खालुंब्रे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक

चाकण : एप्रिल २०१९ मध्ये मुदत संपत असलेल्या खालुंब्रे ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह कार्यकारी मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरु असताना नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सरपंच पदाच्या प्रबळ दावेदार माजी सरपंच सोनल अविनाश बोत्रे यांनी मागील निवडणुकीच्या जमा खर्चाचा हिशोब दिला नसल्याची हरकत घेत त्यांच्या विरोधात त्यांच्या प्रतिस्पर्धी छाया रामदास बोत्रे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेला तक्रार अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी छाया बोत्रे यांच्याकडे याबाबत कसलाच लेखी ठोस पुरावा व सक्षम अधिकाऱ्याची प्रत नसल्याने तडकाफडकी फेटाळून लावला आहे. त्यामुळे सरपंच पदाच्या प्रबळ दावेदार सोनल बोत्रे यांना ही निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सीताराम तुरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी देविदास आतार यांनी दिली

खालुंब्रे ( ता. खेड ) येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक एकुण नऊ जागांसाठी रविवारी ( दि. २४ मार्च ) होणार असून, या ग्रामपंचायतीचे सरपंच पद इतर मागास प्रवर्गासाठी महिलांकरिता राखीव आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आरंभ झाला आहे. सरपंच पदासाठी माजी सरपंच सोनल बोत्रे व अन्य चार महिलांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, सोनल बोत्रे यांना या निवडणुकीतून हटविण्यासाठी त्यांच्या बरोबर सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या त्यांच्या प्रतिस्पर्धी छाया बोत्रे यांनी सोनल बोत्रे यांच्या विरोधात हरकत घेतली होती. सोनल बोत्रे यांनी मागील निवडणुकीचा जमा खर्च दिलाच नाही, असा तक्रार अर्ज छाया बोत्रे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. मात्र, छाया बोत्रे यांच्याकडे याबाबत कोणताच लेखी असा ठोस पुरावा व याबाबत सक्षम अधिकाऱ्याची प्रत नसल्याने हा अर्ज निवडणूक अधिकारी तुरे यांनी तडकाफडकी फेटाळून लावला आहे. त्यामुळे सोनल बोत्रे यांना सरपंच पदाची ही निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तुरे यांनी  दिली. 

या धक्कादायक प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांना काही काळ हाय होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. सरपंच पद आपल्याकडे खेचण्यासाठी बऱ्याच इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली असून, अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकीत मातब्बर व प्रबळ उमेदवारांचा पक्का कस लागणार असल्याने इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

error: Content is protected !!