राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून टोला

‘वल्लभभाईंना तरी कसे पटेल?

मुंबई : सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचा खर्च 2290 कोटी रुपये एवढा वल्लभाईंना तरी कसा पटेल? अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून केली आहे. राज यांनी आज (मंगळवार) त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. राज यांनी नेहमीप्रमाणेच खास आपल्या शैलीतून मोदींवर टीका केली आहे.

राज यांनी आपले नवे व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. त्यामध्ये त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा गुजरातमध्ये नर्मदा नदीत उभा करण्यात आला आहे, यावर भाष्य केले आहे. या व्यंगचित्रात राज यांनी मोदींना वल्लभभाईंच्या पुतळ्याला हार घालताना दाखवले आहे. तर, त्यांच्यापाठीमागे भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अरूण जेटली आणि सुष्मा स्वराज यांना दाखवण्यात आले आहे. राज यांनी यातून मोदी स्वार्थी राजकारण करत असल्याचे म्हटले आहे तर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका खर्च करुन पुतळे उभे करण्यापेक्षा जमिनीवरील जिवंत माणसे जगवा ना! असा सल्ला वल्लभभाई पटेल देत असल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून दाखवले आहे.

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांचा “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 31 ऑक्‍टोबरला होणार आहे. जगातील सर्वांत उंच ठरणारा हा पुतळा 182 मीटर उंचीचा आहे. सरदार पटेलांच्या 143 व्या जयंतीदिनी त्याची पूर्ती होईल. नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवराजवळील केवडिया कॉलनीतील साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे. 90 हजार टन सिमेंट आणि 25 हजार टन लोखंड वापरून हा पुतळा उभारला जात आहे. 250 अभियंते या कामात गुंतले असून, आतापर्यंत पुतळ्याचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.

error: Content is protected !!