भूतकाळाशी नातं जोडणारा : ‘एक निर्णय’

प्रदर्शित : 18 जानेवारी 2019
भाषा : मराठी
कलाकार : सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, कुंजिका काळविंट, विक्रम गोखले, सुहास जोशी, शरद पोंक्षे, सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख
निर्माता आणि दिग्दर्शक : श्रीरंग देशमुख
कालावधी : 2 तास 20 मिनिटं

श्रीरंग देशमुख यांनी अनेक सिनेमात काम केलं आहे. आता त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. ’एक निर्णय.. स्वत:चा स्वत:साठी’ असं या सिनेमाचं नाव. याचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्माता या तीनही जबाबदार्‍या श्रीरंग देशमुख यांनीच पेलल्या असून. या चित्रपटात विक्रम गोखले, सुहास जोशी, शरद पोंक्षे, मंगल केंकरे, सुबोध भावे, मधुरा वेलणकर, प्रदीप वेलणकर, सीमा देशमुख अशी सगळी मंडळी आहेत. शिवाय, या चित्रपटात श्रीरंग देशमुख यांचीही भूमिकाही आहे.
स्पर्म डोनेट याच विषयावर ’एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी’ या सिनेमातून भाष्य करण्यात आले आहे. आपण आयुष्यात अनेकवेळा निर्णय घेतो मात्र कितीवेळा त्या निर्णयावर ठाम राहतो किंवा त्यातील किती निर्णय आपण स्वत:साठी घेतो? हे या सिनेमातून आधोरेखित करण्यात आले आहे.

या सिनेमाची गोष्ट इशान, मानसी आणि मुक्ता या तीन व्यक्तिरेखां भवती फिरते. इशान पेशाने निष्णात डॉक्टर आहे. मानसी ही फिजिओथेरपिस्ट असून इशानच्याच हॉस्पिटलमध्ये ती काम करते. दोघांचं नुकतंच लग्न झालं आहे. आपल्या सुखी संसारात दोघेही आनंदात आहेत. इशानची मैत्रीण आहे मुक्ता. ती डॉक्टर आहेच. पण ती रिसर्चही करते. इशान आणि मुक्ता दोघेही श्रीमंत कुटुंबात वाढले आहेत. आपापल्या कुटुंबात रममाण असताना, मुक्ताच्या आयुष्यात एक अनपेक्षित घटना घडते आणि एक नवं वादळ तिच्या आयुष्यात येतं. यातून तरुन जाण्यासाठी ती एक निर्णय स्वत:साठी घेते, त्याचे परिणाम कळत नकळत इशानवर कसे होतात त्याची ही गोष्ट आहे.

उद्भवणार्‍या प्रसंगांमधून मानवी नातेसंबंध, त्यातली विश्वासार्हता अधोरेखित करणारी ही गोष्ट आहे. याचं कास्टिंग, कलादिग्दर्शन, वेशभूषा आदी गोष्टी नेमक्या असल्या तरी रेंगाळणार्‍या पटकथेचा मोठा फटका या चित्रपटाला बसतो. प्रसंगात असलेल्या व्यक्तिरेखांना काय म्हणायचं आहे हे कळल्यानंतरही तो प्रसंग सुरु राहिल्याने गोष्ट आश्वासक वेगाने पुढे सरकत नाही. या चित्रपटाची लांबी कमी झाली असती तर कदाचित त्याचा फायदा चित्रपटाला झाला असता. शिवाय अनेक ठिकाणी चित्रपट शब्दबंबाळ झाल्यासारखा वाटतो. मुक्ताचे वडील तिला निर्णय घेण्याबद्दल सांगताना असो किंवा मानसीची ताई तिला लग्न पद्धतीबद्दल बोलताना असो, चित्रपटातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही आयुष्याबद्दलची आपापली फिलॉसॉफी बोलू लागतो तेव्हा हा चित्रपट आणखी लांबत जातो. कारण प्रसंग आणि त्याचं गांभीर्य ठसवण्यात पटकथा यशस्वी झाली असली तरी तो प्रसंग लवकर संपत नाही.

चित्रपटाच्या तांत्रिक अंगांबाबत बोलायचं तर संकलन, छायांकन नेटकं आहे. संगीतामध्ये ’हे बरे’ हे गाणं चांगलं झालं आहे. या चित्रपटातून श्रीरंग देशमुख यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं आहेच. पण कुंजिका हा नवा चेहरा ही या सिनेमातून आपल्याला दिसेल. मानसीची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे. तिचा वावर सहज असला, तरी माध्यमात असलेला नवखेपणा त्यात दिसतो. उत्तरार्धात ती काहीशी सेटल झालेली वाटते. याशिवाय सुबोध, मधुरा, विक्रम गोखले आदी मंडळींनी संयमी अभिनय केला आहे.

श्रीरंग देशमुख यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. एक निर्णय हा सिनेमा चांगला झालेला आहेच. पण अधिक प्रयत्न केल्यास त्यांच्याकडून भविष्यात उत्तम सिनेमाची अपेक्षा करायला हरकत नाही.

error: Content is protected !!