अनुभवाच्या शिक्षणातूनच माणूस घडतो : पांडुरंग पोळे

केजे शिक्षण संस्थेत माजी विद्यार्थी मेळावा

पुणे : “पुस्तकी ज्ञानापेक्षा अधिक अनुभवाचे शिक्षण माणूस घडण्यासाठी पूरक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर जाऊन विचार केला पाहिजे. तसेच अनुभवातून नव्या गोष्टी शिकत करिअर घडवावे. विद्यार्थी ते माणूस या प्रक्रियेत महाविद्यालय महत्वाचे योगदान असते. त्यामुळेच माजी विद्यार्थी मेळाव्यातून महाविद्यालयाप्रती आदरभाव दाखवण्याची संधी मिळते,” असे मत महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग पोळे यांनी व्यक्त केले.

केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च, केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च आणि ट्रिनिटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च या चार महाविद्यालयातील २०१२ ते २०१८ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोळे बोलत होते. प्रसंगी प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त अजय डोके, टीसीएसचे अकॅडमिक हेड ऋषिकेश धांडे, केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, मेळाव्याचे समन्वयक व केजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चचे प्राचार्य डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. हरिभाऊ फाकटकर, ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, मेळाव्याच्या समन्वयिका प्रा. अपर्णा हंबर्डे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

अजय डोके म्हणाले, “नोकरी मिळवण्यासाठी काम करण्यापेक्षा आनंद मिळवण्यासाठी करावे. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून रोजगारनिर्मितीची आपण योगदान देऊ शकतो का, याचा विचार आपण केला पाहिजे. शाळा, महाविद्यालय हे आपल्याला घडवणारी केंद्रे असतात. आपल्या अनुभवांची शिदोरी सध्या शिकत असलेल्या मुलांना देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा.”

कल्याण जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त, जीवनाची मूल्ये शिकविण्याचा प्रयत्न संस्था करीत असते. विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना विकसित करीत, नवी कौशल्य आत्मसात करावीत. नोकरीपेक्षा उद्योग करण्यावर विद्यार्थ्यांनी विचार करावा. तशी मानसिकता विकसित करण्यासाठी केजे शिक्षणसंस्था प्रयत्नशील आहे.”

प्रा. डॉ. सुहास खोत यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करावे आणि सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद व्हावा, या उद्देशाने हा मेळावा आयोजिल्याचे डॉ. खोत म्हणाले. हर्षदा जाधव यांनी आभार मानले.

विद्यार्थी रमले जुन्या आठवणीत : चहा पिण्याचे कट्टे, गप्पांची ठिकाणे, क्लासरूम, खेळाचे मैदान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सभागृह, जुने मित्र व शिक्षक, त्यावेळी केलेली मजा आणि अभ्यास अशा सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक विद्यार्थ्यांनी त्या पुढे येऊन सांगितल्या, तर अनेकजण गटागटाने गप्पांमध्ये रंगून गेले. विद्यार्थ्यांच्या या मेळाव्याने ‘केजे’चा परिसर फुलून गेला होता.

error: Content is protected !!