“दादा-भाऊ’ वादात निष्ठावंतांचा लाभ?

पिंपरी – स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून पिंपरी-चिंचवड शहर भाजपामधील जुना-नवा, दादा-भाऊ हा वाद विकोपाला जाण्याची शक्‍यता आहे. या वादात गतवेळी डावलले गेलेले आणि यावर्षी पुन्हा स्थायीत वर्णी लागलेले नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार हे निश्‍चित झाल्याचे समजते. शिंदे यांची वर्णी लावून “दादा-भाऊं’बरोबरच जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही सत्तेत समान संधी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. राष्ट्रवादीला सत्तेतून बाजूला करून पालिकेवर भाजपाची सत्ता आणण्यात आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचा सिंहाचा वाटा आहे. पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असलेले हे दोन्ही नेते भाजपात गेल्यामुळेच पालिकेवर सत्ता आली हे उघड सत्य आहे. पालिकेत सत्ता आल्यापासून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये पदांवरून वाद होत आले आहेत. महापौरपद, पक्षनेतेपद आणि स्थायीच्या सदस्य व अध्यक्ष निवडीवरून हे वाद विकोपाला गेलेले आहेत.

महापलिकेत आणि शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थायीचा अध्यक्ष कोण याबाबत चर्चा रंगली आहे. आमदार महेश लांडगे गटाकडून नगरसेवक संतोष लोंढे यांचे नाव लावून धरण्यात आले आहे. त्यावरुन जोरबैठका सुरू झाल्या आहेत. महापौरपदाची संधी असतानाही लोंढे यांना डावलून नितीन काळजे आणि राहुल जाधव यांना संधी देण्यात आली. दोन्ही महापौर हे भोसरीतील आणि महेश लांडगे समर्थक असल्याने महापौरपद भोसरीकडे राहिले तर स्थायीचे अध्यक्षपद चिंचवडकडे गेले.

सध्याच्या स्थायी समिती अध्यक्षांची मुदत संपुष्टात आल्याने नव्या अध्यक्षांची निवड 7 मार्च रोजी होणार आहे. अध्यक्ष भाजपाचाच होणार हे निश्‍चित असले तरी कोण होणार यावरून भाजपामध्ये दावे प्रतिदावे रंगू लागले आहेत. महापालिकेच्या सोळा सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार, शिवसेना एक आणि अपक्ष एका नगरसेवकाचा समावेश आहे. दोन वर्षांचा कार्यकाल संपलेल्या सदस्यांच्या जागी भाजपच्या शितल शिंदे, आरती चोंधे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे व अपक्ष झामाबाई बारणे यांची वर्णी लागली. अध्यक्षपदासाठी शितल शिंदे, आरती चोंधे, संतोष लोंढे, राजेंद्र लांडगे यांची नावे चर्चेत आहे. त्यापैकी आरती चोंधे या भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक तर संतोष लोंढे व राजेंद्र लांडगे हे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक मानले जातात. तर शितल शिंदे हे भाजपाचे निष्ठावान समजले जातात. स्पर्धेत चार नावे असली तरी खरी चुरस शितल शिंदे व संतोष लोंढे यांच्यामध्ये आहे.

दोन्हीवेळी स्थायीचे अध्यक्षपद चिंचवडला गेलेले असल्याने तसेच संतोष लोंढे हे ज्येष्ठ नगरसेवक असल्याने त्यांना संधी द्यावी, अशी लांडगे गटाची मागणी आहे. त्यासाठी आजी-माजी महापौरांनी पत्रकार परिषद घेवून जाहीर मागणीही केली. मात्र सातत्याने निष्ठावान अणि जुन्या भाजपावासियांना डावलले जात असल्याने यावेळी निष्ठावंतालाच संधी देण्याचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने घेतला आहे. शितल शिंदे यांनी आपली अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांना शब्द दिल्याचे सांगण्यात येत आहे. गतवेळीही शिंदे यांना डावलण्यात आल्याने नाराज झालेल्या शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्याची पुनरावृत्ती झाल्यास भाजपला नाराजी ओढावून घ्यावी लागण्याची शक्‍यता आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार शनिवारी (दि. 2) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. बिनविरोध अध्यक्ष निवडीसाठी भाजपची खलबते सुरू आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर सभापती कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. प्रत्यक्षात 7 मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांची नियुक्‍ती करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.

error: Content is protected !!