संविधानाने प्रत्येकाला मिळाले मुलभूत अधिकार : चंद्रकात हंडोरे

चाकणला भीमशक्तीच्या महामेळाव्या निमित्त संविधान यात्रा

चाकण : संविधानात भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे मुलभूत अधिकार संविधानाने बहाल केले आहेत. पण दुर्देवाने हे मुलभूत हक्क बऱ्याच नागरिकांना आज देखील माहिती नाहीत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वंकष अभ्यासातून संविधानाच्या माध्यमातून दिलेले मुलभूत अधिकारा सर्वांना माहिती असावेत, म्हणून देशभर संविधान सन्मान मेळावे घेण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री व भीमशक्ती संघटनेचे संस्थापक – अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले. 

पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने व कॉंग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली चाकण येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान सन्मान मेळाव्यात मार्गदर्शन करताना चंद्रकांत हंडोरे बोलत होते. यावेळी भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा खेड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, संघटक अमित मेश्राम, जिल्हा कॉंग्रेसचे महेश ढमढेरे, विक्रांत भोर, आंबेगाव कॉंग्रेसचे अध्यक्ष राजूभाई इनामदार, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एड. सुरेश कौदरे, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर, चाकणचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, नितीन जगताप, जमीर काझी, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण दुधवडे, नगरसेविका स्नेहा जगताप, भीमशक्तीच्या सदस्या उषा उनवणे, सुनंदा शिंदे, जाकीर अन्सारी, नितीन भद्रिके, संतोष जाधव, राहुल गोतारणे, सतीश आगळे, महेंद्र दुधवडे, अक्षय घोगरे, अनिल जाधव, विलास रोकडे, राहुल डोळस आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, महिला, ग्रामस्थ व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

चाकण मध्ये भीमसैनिकांनी काढलेली संविधान यात्रा

मेळाव्याच्या प्रारंभी संपूर्ण चाकण शहरातून ढोल – ताशांच्या गजरात निळे झेंडे घेवून भीम सैनिकांनी हंडोरे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणा देत भव्य संविधान यात्रा काढली होती. या संविधान यात्रेत मोठ्या संख्येने भीमसैनिक व महिला सहभागी झाल्या होत्या. या संविधान यात्रेचे चाकण करांनी जोरदार स्वागत केले.

विजय डोळस यांच्या कार्याचा गौरव करून हंडोरे पुढे म्हणाले, ” प्रत्येक भारतीयाला संविधानाची किमान माहिती असायलाच हवी. समाजाच्या प्रत्येक घटका पर्यंत संविधान पोहोचवणे आणि त्यानुसार प्रत्येकाला आपला मूलभूत अधिकार मिळालाच पाहिजे.  या देशातील चातृवर्ण नष्ट झाली पाहिजे. या देशात कायदा सुरु झाला पाहिजे, अशी भावना डॉ. बाबासाहेबांची होती.”  भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष विजय डोळस म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत अशा विचार धारेवर चालणारी भीमशक्ती संघटनेची चंद्रकांत हंडोरे यांनी सन २००२  मध्ये अथक परिश्रमातून स्थापना केली. त्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले जात आहे. घटनेतील मुलभूत हक्क, अधिकार यामुळे सर्वांना समान वागणूक मिळत आहे. मात्र, काही नेते राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.” 

अमित मेश्राम, लक्ष्मण दुधवडे, महेश ढमढेरे, राजू इनामदार, चंद्रकांत गोरे, जमीर काझी, निलेश कड आदींनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.  विजय डोळस यांनी सर्वांचे आभार मानले. 

error: Content is protected !!