तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

बहुळ येथे घडला होता प्रकार

चाकण (वार्ताहर) : चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील बहुळ ( ता.खेड ) गावच्या हद्दीतील जमीन गट नं. ११३३ मध्ये  एकोणचाळीस वर्षीय तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाच जणांवर सोमवारी ( दि. ३ डिसेंबर ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सबंधित तरुणाने शनिवारी ( दि. १ डिसेंबर ) सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान झाडाला दोरी बांधून आत्महत्या केली होती. त्यानंतर येथील पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद करून रात्री एकुण पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दत्तात्रय लक्ष्मण खलाटे ( वय – ३९ वर्षे, रा. बहुळ, ता. खेड,) असे आत्महत्या केलेल्या  तरुणाचे नाव आहे. त्याचा भाऊ  संभाजी लक्ष्मण खलाटे ( वय – ४३ वर्षे, रा. बहुळ, ता. खेड,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्या नंतर येथील पोलिसांनी भरत बबन शेळके, शक्ती उर्फ बापू महादेव साबळे, मीना भरत शेळके, पिणु शेळके (सर्व रा. बहुळ, ता. खेड) व शशिकांत प्रकाश मोरे ( रा. सिद्धेगव्हाण, ता. खेड ) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील सर्वांनी संगनमताने दत्तात्रय खलाटे यास मानसिक, शारीरिक त्रास देवून त्याचे जगणे असहय्य केल्याने वैतागलेल्या दत्तात्रय याने नैराश्यातून बहुळ ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील जमीन गट नं. ११३३ मध्ये शनिवारी ( दि. १ डिसेंबर ) सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेवून आत्महत्या केली होती. या प्रकरणी येथील पोलिसांनी त्याच दिवशी गु.र.नं.२५६/२०१८ सीआरपीसी १७४ प्रमाणे आकस्मित मयत अशी नोंद केली होती.

दरम्यान, दत्तात्रय याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी मयत दत्तात्रय याच्यावरही विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शना खाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!