लहानांमधील डोळ्यांचा कर्करोग!

डॉ. सर्वेश तिवारी

डोळ्यांच्या कर्करोगाचे (रेटिनोब्लास्टोमा) प्रमाण लहान मुलांत सर्वाधिक असून भारतात दरवर्षी या आजाराचे दोन ते अडीच हजार रुग्ण आढळतात. साधारणत: सहा वर्षांच्या आतील मुलांना हा आजार होत असला तरी या आजाराची लागण झालेल्या मुलांवर तत्काळ उपचार केल्यास त्यातून त्यांची मुक्तता करता येते. मात्र, 60 टक्के मुलांच्या आजाराचे निदान वेळेत होत नसल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण होते. डोळ्यांच्या ट्युमरने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत दोन ते तीन पटीने वाढ झाली आहे. विकसित देशांत रेटिनोब्लास्टोमा होऊनही त्यातून बचावणाऱ्या मुलांचे प्रमाण 95 टक्के आहे. हेच प्रमाण विकसनशील देशांत अवघे 50 टक्के आहे. कर्करोगाचे निदान होण्यास विलंब झाल्यास ट्युमर डोळ्याबाहेर पसरून रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे रेटिनोब्लास्टोमा या आजारावर लवकर उपचार करणे गरजेचे ठरते.

कुटुंबातील एखाद्या सदस्याला डोळ्याचा कर्करोग असल्यास पुढील पिढीतील लहान मुलालादेखील हा आजार होण्याची दाट शक्‍यता असते. अनुवंशिक आजार होण्याचे प्रमाण 30 टक्के आहे. मात्र, 70 टक्के मुलांना कोणतीही कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसताना हा आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. आईला गर्भाशयाचा कर्करोग असल्यास जन्माला येणाऱ्या मुलाला डोळ्याचा कर्करोग होण्याची दाट शक्‍यता असते. आईच्या गर्भाशयाच्या कर्करोगाला कारणीभूत “ह्युमन पॅपिलोमा’ हा व्हायरस या मुलाच्या जन्माच्या वेळी त्यांच्या डोळ्यांना बाधा निर्माण करतो. त्यामुळे मुलांना डोळ्याचा कर्करोग होतो.

आजाराचा धोका!
डोळ्यांचा कर्करोग लहान मुलांत आढळतो. या आजाराच्या एकूण प्रकरणांपैकी दोन तृतीयांश प्रकरणे वय वर्षे दोनहून कमी वय असलेल्या मुलांत दिसून आली आहेत. तर 95 टक्के प्रकरणे वय वर्ष पाचहून कमी वय असलेल्या मुलांबाबत आहेत.

लक्षणे

डोळे तिरळे होणे किंवा डोळे सारखे हलणे

एकाच किंवा दोन्ही डोळ्यांतील दृष्टी मंदावणे
दोन्ही डोळ्यांत वेगवेगळ्या रंगांची बुब्बुळ असणे
डोळ्यातल्या बाहुल्या आकाराने मोठ्या भासणे किंवा लाल होणे आणि त्यासह डोळ्यांत तीव्र वेदना होणे

निदान कसे करावे!
डोळ्यांचा कर्करोग झाल्यास नेत्रचिकित्साकडून डोळ्यांची तपासणी आणि इमेजिंग टेस्ट करून घ्याव्यात. त्यातून रेटिनोब्लास्टोमा आहे किंवा नाही, याचे निदान होऊ शकते. याशिवाय बायोमायक्रोस्कोपी, डोळ्यांची अँजिओग्राफी, सी.टी. स्कॅन, एमआरआय, पेटस्कॅन, बायॉप्सी या तपासण्यांच्या साहाय्याने डोळ्याच्या कर्करोगाचे निदान निश्‍चित होते. डोळ्यांच्या कर्करोगावर रेडिएशन, केमोथेरपी आणि लेझरथेरपी यांच्या साहाय्याने उपचार केले जातात.
या उपचारपद्धती आवश्‍यक असल्या तरी डोळा शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो. तसेच रेडिएशनमुळे मोतिबिंदू किंवा डोळा पूर्णत: कोरडा होणे, हे दुष्परिणाम दिसून येतात. डोळ्यांचा कर्करोग झालेल्या 10 मुलांपैकी 9 मुलांचा रेटिनोब्लास्टोमा पूर्णपणे बरा करता येतो. ट्युमर डोळ्यांच्या बाहेर पसरला नसेल तर रेटिनोब्लास्टोमा झालेले रुग्ण बरे होऊन भविष्यात निरोगी आयुष्य जगू शकतात.

error: Content is protected !!