तरुणाच्या हत्येप्रकरणी आठ हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल

खराबवाडी येथील थरार : एकाची प्रकृती चिंताजनक

चाकण (वार्ताहर) : कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून एकोणीस वर्षीय तरुणाची घातक हत्यारांनी निघृण हत्या केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी शनिवारी ( दि. ९ फेब्रुवारी ) एकुण आठ हल्लेखोरांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण जवळील खराबवाडी ( ता. खेड ) येथे दोन युवकांवर आठ जणांच्या टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात एकाचा रक्तबंबाळ अवस्थेत गंभीर जखमी होवून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि. ८ फेब्रुवारी ) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तर या हल्ल्यात अन्य एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर येथील एका खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात तातडीचे उपचार सुरु आहेत. 

प्रशांत धर्मनाथ बिरदवडे ( वय – १९ वर्षे, रा. राणूबाईमळा, चाकण.) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याचा मित्र पियुष शंकर धाडगे ( वय – १९ वर्षे, रा. धाडगेमळा, चाकण. ) हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येथील एका खाजगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात तातडीचे उपचार सुरु आहेत. प्रशांत बिरदवडे याच्या खून प्रकरणी पियुष धाडगे याने चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी आकाश राजाभाऊ शिंदे ( रा. जंबूकर वस्ती, खराबवाडी,), पांग्या लांडगे ( रा. खराबवाडी,), बफन लांडगे ( रा. खराबवाडी,), प्रथमेश जाधव ( रा. खराबवाडी,), अक्षय लोमटे ( रा. जंबूकर वस्ती, खराबवाडी,), बाब्या राजगुरू ( रा. खराबवाडी,), लंगडा पुरी ( पूर्ण नाव, गाव पत्ता समजला नाही,) व हर्षल खराबी ( रा. खालुंब्रे, ता. खेड ) या आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एक महिन्यापूर्वी येथील समर्थ कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आकाश शिंदे याच्या बरोबर प्रशांत बिरदवडे व पियुष धाडगे यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून चिडलेल्या वरील आठ जणांच्या टोळक्याने शुक्रवारी ( दि. ८ फेब्रुवारी ) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान प्रशांत बिरदवडे व पियुष धाडगे हे दोघेजण एकाच डीओ मोटार सायकल वरून चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्याने खराबवाडी ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील कुशल स्वर्णाली सोसायटी समोरून जात होते. त्यावेळी पूर्वनियोजित कट रचून सबंधित ठिकाणी दोन दुचाकीवर आलेल्या वरील आठ हल्लेखोरांनी दहशतीचा प्रचंड थरार करत संगनमताने त्या दोघांना अडवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता, लोखंडी रॉड, हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने पियुष धाडगे व प्रशांत बिरदवडे यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत बिरदवडे याचा जागीच मृत्यू झाला. घटना घडल्या नंतर बिरदवडे याचा मृतदेह तब्बल अर्धा तास त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. 

पोलीस उपायुक्त स्मार्ताना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत आलसटवार, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार, गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून घटनेची माहिती घेतली. चाकण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रशांत बिरदवडे याचा मृतदेह ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तिथे उत्तरीय तपासणी व विच्छेदन होताच रात्री उशिरा अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी एकुण आठ जणांवर गु.र.नं. २९१/२०१९ नुसार, भा.द.वि.कलम ३०२, ३०७, १२० ( ब ), १४३, १४७, १४८, १४९, ३४१, ५०४, ५०६, ५०६ कलम ७, आर्म कायदा कलम ४ ( २५ ), म.पो.अधि. कलम ३७ ( १ ) ( ३ ) मुं. पो. अधि. कलम १३५ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, खेड तालुक्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या या धक्कादायक घटनेने पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले असून, याबाबत अनेक तर्क वितर्क लढविले जावू लागले आहेत.  

अन…त्यांना तुरुंगवासही झाला होता :  ” हल्लेखोरांच्या हल्ल्यात मरण पावलेला प्रशांत बिरदवडे व जखमी पियुष धाडगे यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना येरवडा येथे तुरुंगवासही झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.” 

error: Content is protected !!