जनहो, दगडी कोळसा मिरवू नका !

धर्मशिक्षणाचा अभाव, तसेच सनातन हिंदु धर्माच्या गौरवशाली वारसाविषयक जाणीवेचा अभाव यांमुळे अनेक जन्महिंदू पाश्‍चात्त्य नववर्षारंभ म्हणजेच १ जानेवारी हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभदिन म्हणून साजरा करतात. वास्तविक चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा, नव्हे अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे; पण समाजातील एक मोठा घटक १ जानेवारी आणि गुढीपाडवा दोन्ही दिवस साजरे करतो. हे म्हणजे अमृताच्या जोडीला विषाचा घोटही पिण्यासारखे आहे. नववर्ष होण्यास कोणतेही तार्किक, ऐतिहासिक, नैसर्गिक, आध्यात्मिक कारण नसलेला १ जानेवारी हा दिवस वर्षारंभ म्हणून साजरे करणे हा वैचारिक आणि सांस्कृतिक धर्मांतराचाच प्रकार आहे.

संकल्प नव्हे, भ्रमनिरास 

नाविन्य आणि संकल्प हे एकप्रकारे समीकरण असल्यासारखेच आहे. साधी वही नवीन घेतली, तरी व्यक्ती त्या वहीमध्ये सुवाच्च अक्षर काढण्याचा संकल्प करते. १ जानेवारी साजरे करणार्‍यांचा आदला दिवस मात्र रात्री मेजवान्या झाडण्यात जातो आणि मध्यरात्र उलटून गेल्यानंतर दिवस संपतो अन् १ जानेवारीचा दिवस माध्यान्हानंतर चालू होतो. अर्धा दिवस संपल्यानंतर जर दिवस चालू होत असेल, तर कुठला संकल्प आणि कुठला निश्‍चय ! चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा आरंभदिन म्हणून साजरे होण्यामागे नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. ऋतुंचा राजा समजल्या जाणार्‍या वसंत ऋतुचा प्रारंभही गुढीपाडव्यालाच होतो. याच सुमाराला झाडांना नवीन पालवी फुटते. याच दिवशी रामाने वालीचा वध केला. रावणवधानंतर प्रभु श्रीराम अयोध्येला परत आले. त्यांच्या स्वागतासाठी घरांवर ब्रह्मध्वज उभारण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रजापती लहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या लहरींमुळे वनस्पती अंकुरण्याची क्षमता वाढणे, बुद्धी प्रगल्भ होणे, विहिरांना नवीन पाझर फुटणे असे परिणाम होतात. त्या काळात वसंत ऋतु चालू होतो. 

अहिंदूंचे भोंगळ आणि हिंदूंचे शास्त्रशुद्ध कालमापन !  

१ जानेवारीला नववर्ष साजरे करण्यामागे मात्र कोणतेही कारण नाही. उलट वर्ष १५८२ मध्ये ग्रेगोरियन दिनदर्शिका बनण्याच्या आधी प्राथमिक स्तरावर कालमापन असणारे रोमन, ख्रिश्‍चन यांच्याकडून कधी जुलैमध्ये, कधी मार्चमध्ये, कधी सप्टेंबरमध्ये, तर कधी डिसेंबरमध्ये नववर्ष साजरे होत असे. कालमापनामध्ये असलेल्या प्रचंड भोंगळपणामुळे आजही चार वर्षानंतर फेब्रुवारीमध्ये एका दिवसाची अतिरिक्त गणना करावी लागत आहे. प्रारंभी रोमन दिनदर्शिकेनुसार १ मार्च हा नववर्षारंभ समजला जात असते. त्या दिनदर्शिकेत केवळ १० महिने होते. लॅटिनमध्ये सप्टेम्, ऑक्टो, नोव्हेम्, डिसेम् म्हणजे अनुक्रमे सात, आठ, नऊ आणि दहा ! सध्या मात्र हे क्रमांक ९ ते १२ चे महिने आहेत. ही विसंगती आज प्रलचित ग्रेगोरियन दिनदर्शिकेमध्येही आहे. इसवी सन पूर्व सातव्या शतकापर्यंत जानेवारी हा महिनाही अस्तित्वात नव्हता. इसवी सन पूर्व ४६ व्या शतकात ज्युलियस सीझर याने सूर्यावर आधारित दिनदर्शिका सिद्ध करून आधी प्रचलित असलेल्या चुकीच्या दिनदर्शिकांमध्ये सुधारणा केली. १५ व्या शतकाच्या शेवटीशेवटी १ जानेवारी हा दिवस वर्षारंभ म्हणून गणला जाऊ लागला. सर्व कॅथोलिक देशांनी आणि नंतर प्रोटेस्टंट देशांनी ही दिनदर्शिका स्वीकारली. कुठे ही महाघोळिष्ट कालमापनपद्धत, तर कुठे भारतीय ऋषींनी लाखो वर्षांपूर्वी सांगितलेली शास्त्रशुद्ध कालमापन पद्धत ! कुठे जेमतेम अडीच सहस्र वर्षांची परंपरा असलेली ख्रिस्ती कालगणना, तर कुठे प्रतिदिनच्या पूजेतही देशकालकथनाद्वारे अनंत काळाचे स्मरण करण्याची हिंदूंची प्रथा ! हा अनंत काळ कल्प, मन्वंतर, महायुग, युग असा मोजला जातो. सत्य, द्वापार, त्रेता आणि कलि अशा चार युगांचे एक महायुग गणले जाते. एका महायुगात ४३ लाख २० सहस्र वर्षे असतात. अशा ७१ महायुगांचे एक मन्वंतर, १४ मन्वंतरांचा एक कल्प, ३६० कल्पे म्हणजे ब्रह्मदेवाचे एक वर्ष असे गणले जाते. सध्या ब्रह्मदेवाच्या ५१ व्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे श्‍वेतवाराह कल्प चालू असून त्यातील ६ मन्वंतरे पूर्ण होऊन ७ वे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. यातील ७१ महायुगांपैकी २७ महायुगे पूर्ण झाली असून २८ व्या महायुगातील कलियुग चालू आहे. या कलियुगातील ५११९ वर्षे पूर्ण झाली असून सध्या ५१२० वे वर्ष चालू आहे. हिंदूंच्या कालमापनपद्धतीनुसार सहस्रो वर्षपूर्वीच्या, नंतरच्या ग्रहण, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त यांच्या वेळाही अचूक सांगता येतात. 

हिंदूंचे दायित्व !

खरे तर ही गौरवशाली परंपरा हिंदूंनी विश्‍वभरात पोहोचवण्याची व्यापक मोहीम हाती घेऊन गुढीपाडव्याला चालू होणार्‍या नववर्षांचे श्रेष्ठत्व पटवून द्यायला हवे; पण पाश्‍चात्त्यांची झापडे लावलेले जन्महिंदू मात्र हिंदु परंपरा सोडून १ जानेवारी हा दिवस वर्षारंभ म्हणून साजरा करत आहेत. हिरे फेकून देऊन दगडी कोळसा मिरवण्यासारखेच हे आहे. हिंदूंनीच आता स्वतःच्या गौरवशाली परंपरेविषयी जागृत होऊन त्याचा प्रचार-प्रसार करण्याचा संकल्प केला, तर विश्‍वस्तरावर गुढीपाडवा हा वर्षारंभ म्हणून साजरा होण्यास वेळ लागणार नाही.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था.

संपर्क : 7775858387

error: Content is protected !!