अवनी वाघिण

अवनी वाघिणीला सुप्रीम कोर्टाकडून रीतसर परवानगी घेऊन शेवटी कठोर अंतःकरणाने मारावे लागले.

सर्व प्रयत्न करूनही तिला जेरबंद करणे जमले नाही, आणि म्हणूनच हा अप्रिय निर्णय घ्यावा लागला असे दिसते. आणि हेच पुढारी सांगणार आमचा न्यायसंस्थेवर विश्वास आहे.

आता या घटनेचा राजकीय लाभ घेण्यासाठी बरेच जाणकार आपले वक्तृत्व सादर करू लागले आहेत.

पण वाघिणीने मारलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना यांनी कधी भेट दिली का हो ? काही मदत केली का ? वाचनात तर आले नाही.

वाघिणीप्रति इतकी माया आणि प्रेम दाखविणाऱ्या मंडळींनी जंगलात अचानक मरणारे मोर, हरणे; किंवा नदी/तलाव/समुद्र येथे एकाएकी मोठ्या संख्येने मृत होणाऱ्या मासे, कासवे व इतर जलचर संबंधी बातम्या ऐकून काही केले का कधी ? का त्याचा संबंध प्रदूषणाशी आणि पर्यायाने त्यांच्या हितसंबंधियांशी असल्याचे लक्षात येताच प्रश्नाला बगल दिली असावी यांनी ? तर असे हे आपले सोयीने चालणारे लोकप्रतिनिधी किंवा सत्तेबाहेरील/पदच्युत राजकारणी !

काही वर्षांपूर्वी पुण्यात बेफिकीरपणे बस चालवून ९-१० जणांचे बळी घेणाऱ्या आणि कित्येकांना जखमी/अपंग करणाऱ्या ड्रायव्हरला ताबडतोब शिक्षा करा अशा मागणीसाठी या वाचाशूर मंडळींपैकी किती पुढे आले ? किती आंदोलने केली ? की या ग्रस्त कुटुंबियांशी त्यांना काही देणे-घेणे नाही ? का ती घटनाच विसरले ?

एकीकडे पूर्ण पुरावा असलेला गुन्हेगार तुरुंगात सुरक्षित, आणि तिकडे शोध चाललेल्या गुन्हेगाराबद्दल तगादा !

अजब वक्तृत्व आहे या शहाण्यांचे !!! काहीतरी करून चालत्या गाडीला ब्रेक लावणे हेच यांचे काम, बरीच वर्षे पुरेल त्यांना ! लोक फक्त करमणूक म्हणून पाहतील.

प्रमोद बापट, पुणे

error: Content is protected !!