हैदराबाद बलात्कार: मृतदेह पूर्ण जळाला की नाही हे पाहण्यासाठी ते नराधम आले होते परत

318

हैदराबादमधील सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे. बलात्काराची ही घटना म्हणजे क्रूरतेचा कळस आहे. आरोपींनी कामावरुन घरी परतणाऱ्या महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या केली. नंतर निर्जन स्थळी नेऊन तिचा मृतदेह जाळला.

राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील चट्टनपल्ली गावात एका पूलाखाली आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावली. मृतदेह पेटवल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले व पुन्हा काही वेळाने मृतदेह पूर्णपणे जळाला आहे की, नाही ते पाहण्यासाठी तिथे परत आले होते. पोलीस तपासातून ही माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपींनी हे कृत्य केले.

आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चट्टनपल्ली गावातील पूलाखालची जागा निवडली. पण त्याआधी शिवा आणि नवीन या दोन आरोपींनी राष्ट्रीय महामार्ग ४४ वर शामशाबाद आणि शादनगर दरम्यान वेगवेगळया जागांची पाहणी केली होती. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जागेचा शोध सुरु असताना दोन आरोपी पुढे मृत महिलेची स्कूटर चालवत होते तर अन्य दोघे ट्रकमध्ये होते. महिलेचा मृतदेह ट्रकच्या केबिनमध्ये होता. स्कूटरवर असलेल्या दोघांनी दोन ते तीन जागांची पाहणी केली. पण तिथे वर्दळ असल्याने अखेर त्यांनी चट्टनपल्ली गावातील पूलाखालची जागा निवडली अशी माहिती या प्रकरणात तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे