२०२४ लोकसभा निवडणुकीआधी प्रत्येक घुसखोराची शोधून हकालपट्टी करु – अमित शाह

47

देशभरात एनआरसी लागू करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी २०२४ पर्यंतची मुदत निश्चित केली आहे. पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीआधी प्रत्येक घुसखोराची ओळख पटवून त्याची हकालपट्टी करु असे अमित शाह यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील भाजपाचे काही नेते एनआरसीशी सहमत नाहीत.

पक्षाला अलीकडेच तिथे झालेल्या पोटनिवडणुकीत फटका बसला होता. पण अमित शाह मात्र एनआरसीच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. देशातील अनेक पक्षांचा एनआरसीच्या अंमलबजावणीला विरोध आहे. झारखंडमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये बोलताना त्यांनी एनआरसीची देशभरात अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले.

“२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी एनआरसी देशभरात लागू झालेला असेल. प्रत्येक घुसखोराला शोधून आम्ही त्याची हकालपट्टी करु” असे शाह म्हणाले. “राहुल गांधी म्हणतात त्यांना काढू नका. ते कुठे जाणार? काय खाणार? पण मी तुम्हाला २०२४ पूर्वी सर्व घुसखोरांना बाहेर काढण्याचे आश्वासन देतो” असे अमित शाह म्हणाले.