समाज शिक्षित करण्यात फुलेंचे योगदान मोलाचे : डॉ. एच. डी. नाईक

219

खानवडीत १२ वे राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्य संमेलन

पुणे : “महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रकाशाची वाट दाखवत गुलामगिरीतून बाहेर काढण्याचे महान कार्य केले. स्त्री आणि पुरुष या दोन जाती असून मानवता हा एक धर्म असल्याचे महात्मा फुले यांनी सांगितले. शिक्षणापासून वंचित महिला वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून कर्तृत्ववान बनविले. समाजाला शिक्षित करण्यात फुले दाम्पत्याचे योगदान अतिशय मोलाचे आहे,” असे प्रतिपादन महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. एच. डी. नाईक यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने खानवडी (ता. पुरंदर) येथे आयोजित महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी डॉ. नाईक बोलत होते. यावेळी स्वागताध्यक्ष शशिकांत कांबळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते, सैराट फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा, पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, चाटे शिक्षण समूहाचे प्रा. फुलचंद चाटे, मुंबई अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, अभिनेत्री पौर्णिमा डे, संयोजक शरद गोरे, दशरथ यादव आदी उपस्थित होते. यावेळी खानवडीतील महात्मा फुले स्मारकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर संमेलस्थळी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी प्रा.विजय काकडे यांच्या ‘माझी शाळा प्रवेशाची गोष्ट’ व प्रा.सुरेश कोडीतकर यांच्या ‘तंट्या भिल्ल’ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, पत्रकार बापूसाहेब गोरे, उद्योजक नवनाथ येवले, अभिजित बोरा, केसरीचे पत्रकार अमोल बोरसे, संदीप ठवाळ, प्रकाश दिंडले, नितीन पाटील, नितीन कडू, विठ्ठल थोरात, विजय घोडके, विश्वास चव्हाण, भारत पाटील, स्नेहल पाटील, रत्नप्रभा पाटील, चांगदेव पाटील, सुरज अंगुले, सीमा पोद्दार, आत्माराम क्षीरसागर, वैशाली काळे नगरकर, विठ्ठल खेडेकर, संभाजी कांचन, बाळकृष्ण राठोड, अण्णासाहेब खंडागळे, विठ्ठल बेलेकर, जितेंद्र पाटील आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. नाईक म्हणाले, “चांगले साहित्य आणि साहित्यिक निर्माण करायचे असतील, तर मुलांनामध्ये लहान वयापासूनच विविध विषयांची पुस्तके वाचनाची आवड जोपासण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पालकांनी व शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे. मुलांना मोबाईल देण्याची विविध विषयांचे पुस्तक वाचण्यासाठी द्यावीत.” डॉ. संजय चोरडिया यांनी शिक्षणाचे महत्व सांगताना समाजाची प्रगती होण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग असल्याचे ओळखून फुले यांनी बहुजन समाज आणि स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यांचा हा वारसा सूर्यदत्ता ग्रुप समर्थपणे पुढे नेत आहे, असे त्यांनी नमूद केले. शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले. श्यामकुमार मेमाने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दशरथ यादव यांनी सूत्रसंचालन केले तर सुनील दिवार यांनी आभार मानले.

खानवडीतील दोन विद्यार्थ्यांना १० हजारांची शिष्यवृत्ती

यावेळी डॉ. संजय चोरडिया यांनी खानवडीच्या जिल्हा परिषद शाळेत दहावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या एका विद्यार्थ्याला व एका विद्यार्थिनीला प्रत्येकी दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावाने देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच खानवडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत अभ्यास दौऱ्यासही निमंत्रित केले. मुख्याध्यापकांच्या मार्फत ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहे.