कोर्टात नव्या सरकारला धक्का देण्यासाठी शरद पवारांनी टाकला डाव

63

25 नोव्हेंबर : राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं असलं तरी सत्तानाट्य अद्याप संपलेलं नाही. सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्राच्या सत्तानाट्याबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान सरकारला हादरा देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा डाव टाकला आहे.राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं. मात्र आता अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे किती आमदार आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण शिवसेनेच्या 56, राष्ट्रवादीच्या 50 आणि काँग्रेसच्या 44 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या घेण्यात आल्या आहेत. आम्ही नव्या सरकारस्थापनेसाठी सज्ज आहोत, असं या तीन पक्षांच्या आमदारांचं सह्या असणारं प्रतिज्ञापत्र आज सुप्रीम कोर्टात सादर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फडणवीस सरकारसाठी हा मोठा धक्का असणार आहे.’रेस्क्यू ऑपरेशन’ला यश तीन दिवसांपासून गायब असलेले राष्ट्रवादीचे पाच पैकी तीन आमदार, अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नितीन पवार मुंबईला परतले आहेत. तीन दिवसांपासून यांचा कोणताही संपर्क होत नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. आता केवळ दोन आमदार संपर्कात नाहीत, एक स्वत: अजित पवार आणि दुसरे अण्णा बनसोडे. या तीन आमदारांना परत आणण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष धीरज शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.