‘रात्रीस खेळ चाले’, उद्धव ठाकरे यांनी भाजपला केलं ‘हे’ ओपन चॅलेंज!

130

मुंबई,23 नोव्हेंबर- महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधी जनमानस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला तर हिम्मत असेल तर आमचे आमदार फोडूनच दाखवा, मर्द मावळे नेहमी रणांगणात असतात, अशा शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला ओपन चॅलेंज केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ‘महाविकासआघाडी’चे सरकार येणार,असा नवा दावा केला आहे. शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर तिन्ही पक्षात चर्चा सुरू आहे. कुठलेही संकट आले तरी देखील एकत्र राहणार, आम्ही तिघे एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार असेही संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी स्पष्ट केले.टीव्हीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले’, याप्रमाणे भाजपने अजित पवारांच्या एका गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर भाजपाकडून ‘फर्जिकल स्ट्राईक’ केले, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आम्हाला विरोधी पक्ष नको, स्वतःच्या पक्षातील प्रतिस्पर्धी नको फक्त मी आणि मीच; मर्द मावळे हे नेहमी रणांगणात असतात. आमचे राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीस खेळ चाले; आम्ही जे करतो ते उघड उघड करतो, असा टोलाही ठाकरेंनी यावेळी लगावला. आमची लढाई भाजपाच्या ‘मी’ पणाविरोधात सुरू आहे. केंद्रातील नेत्यांनी जे केले त्याचा सूड आम्ही घेऊ, असा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे. मधल्या काळात ईव्हीएम आरोप केला जात आहे. मला वाटते मी पुन्हा येईन बोलण्या पेक्षा मी जाणार नाही, असे सांगून टाकावे. एकूणच आपल्या देशात लोकशाहीच्या नावाने खेळ चालला आहे, तो लाजिरवाणा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.यादी तयार करून आमदारांच्या सह्या करून ठेवल्या होत्या!, त्या याद्या कार्यालयातून अजित पवारांनी ताब्यात घेतल्या. त्या याद्या राज्यपालांना सादर केल्या असतील. ५४ जणांची यादी दाखवून राज्यपालांची फसवणूक केली, असा आरोप शरद पवार यांनी केला.प्रामाणिक कार्यकर्ता भाजपासोबत जाणार नाही, जे काही सदस्य गेले आणि जे जाणार असतील त्यांना पक्षांतर बंदीचा कायदा आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व नाकारता येत नाही.