‘अ‍ॅण्ड पिक्चर्स’वर 23 नोव्हेंबर रोजी पाहा ‘झीरो’

139

एखादी व्यक्ती बुटकी आहे की उंच किंवा तिची पार्श्वभूमी काय आहे, यावर कोणी स्वप्ने रंगवायची, हे ठरवीत नसतो, ही भावना झीरो चित्रपटातील सपने साइझ देख के नहीं आते’, या संवादात अचूक व्यक्त होते. अगदी कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरी एखादी व्यक्ती अथक प्रयत्नाने आपली स्वप्ने साकार करू शकते. उंचीने बुटका असलेल्या 38 वर्षांच्या बऊआ सिंह याचीही स्थिती अशीच असते. तो उंचीने बुटका असला, तरी त्याची स्वप्ने फार उत्तुंग असतात. त्यामुळे आपल्या जीवनाचा साथीदार आणि स्वप्ने साध्य करण्यासाठी तो विलक्षण उत्साहाने जीवन जगत असतो. शाहरूख खान, अनुष्का शर्मा आणि कत्रिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात मोहम्मद झीशान अय्यूब, तिग्मांशू धुलिया आणि शीबा चढ्ढा हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.

‘झीरो’ चित्रपट प्रेक्षकांना धमाल विनोदी तसेच भावपूर्ण भावनांच्या हिंदोळ्यावर झुलण्याचा अनुभव देईल. दिग्दर्शक आनंद एल. राय यांनीच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून हिमांशू शर्मा यांनी त्याचे लेखन केले आहे. शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री 8.00 वाजता ‘अ‍ॅण्ड पिक्चर्स’ वाहिनीवर ‘सॅटर्डे प्रीमिर नाईटस’ मालिके अंतर्गत या चित्रपटाचे प्रसारण केले जाणार आहे.

कत्रिना कैफ म्हणाली, मी जेव्हा चित्रपट उद्योगात प्रवेश केला, तेव्हा मला पक्कं ठाऊक होतं की मी आज ज्या स्थानावर आहे, तिथे पोहोचण्यासाठी मला कठोर मेहनत करावी लागेल. माझ्या मते झीरो या चित्रपटातून असा संदेश दिला जातो की आपली स्वप्नं पूर्ण करण्यापासून ज्या गोष्टी तुम्हाला थोपवून धरताहेत, असं वाटतं, त्यांच्या पुढे जा आणि आपली स्वप्ने पूर्ण करून एक समाधानी जीवन जगा. प्रत्येकाच्या जीवनात एखादी अशी गोष्ट असावी, जी तो जिवापाड जपतो, असे सांगणारा हा चित्रपट माझ्यासाठी खास आहे.”

आपल्या व्यक्तिरेखेबद्दल अनुष्का शर्मा म्हणाली, आफियाची व्यक्तिरेखा ही स्वतंत्र वृत्तीची असून तिने आजवर खूप काही साध्य केलं आहे. ती एक यशस्वी स्त्री आहे. तिला जो आजार जडला आहे, तो असतानाही तिने आजवर असंख्य पुरस्कार प्राप्त केले असून ती व्यावसायिक जीवनात एक यशस्वी ठरली आहे. बऊआ आणि आफिया या व्यक्तिरेखांपुढे आव्हानं असली, तरी त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी एक स्वप्न आहे, जे त्यांना साध्य करायचं आहे.”

चित्रपटाची कथा मीरत शहरात घडते. तिथे राहणारा बऊआ सिंह (शाहरूख खान) हा उंचीने बुटका असला, तरी त्याच्यात आत्मविश्वस ठासून भरलेला असतो. तो जेव्हा जेव्हा अडचणीत येतो, तेव्हा तेव्हा त्याचा जिवलग मित्र गुड्डूसिंह (झीशान अय्यूब खान) हा त्याच्या मदतीला धावून येतो. बऊआशी लग्न करण्यास कोणतीच मुलगी तयार नसते, तेव्हा त्याची भेट आफिया युसुफझाई (अनुष्का शर्मा) हिच्याशी होते. सेलेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त असली, तरी आफिया ही एक यशस्वी आणि बुध्दिमान शास्त्रज्ञ असते. तिचे मन जिंकण्यासाठी बऊआ अनेक युक्त्या योजतो आणि शेवटी तिला आपल्या प्रेमात पाडतो. पण नामवंत तारका बबिताकुमारी (कत्रिना कैफ) हिचा बऊआच्या जीवनात प्रवेश होताच त्यांच्या प्रेमकथेला एक कलाटणी मिळते आणि आफियाबरोबरचे त्याचे संबंध तणावपूर्ण होतात. हा प्रेमाचा त्रिकोण या तिघांना वेगवेगळ्या शहरांमध्ये घेऊन जातो आणि त्यातूनच अखेरीस बऊआला एका धाडसाला सामोरे जावे लागते, ज्यात तो मीरतहून थेट मंगळावर जातो!