तर आणि तरच आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ – राष्ट्रवादी

255

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष हा शिगेला पोहोचलेला असताना राष्ट्रवादीने आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना जर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असलेले सर्व प्रकारचे नाते तोडणार असेल तरच शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देण्यावर विचार करू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आल्याचे पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

मलिक म्हणाले,’ महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शविली असताना आमचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे आहे. अशावेळी शिवसेनेला पाठिंबा हवा असल्यास आधी त्यांच्या केंद्रातील मंत्र्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल’.

दरम्यान, शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सत्ता स्थापनेसाठी अजून कुठलाही प्रस्ताव आला नसला तरी त्यांच्या प्रस्तावावर नक्की विचार केला जाईल. हा निर्णय करताना काँग्रेस पक्षाचाही विचार घेतला जाईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले आहे. आमच्याकडे सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे बहुमत नसून जर आणखी शिवसेना आणि भाजप सत्ता स्थापनेसाठी पुढे आल्यास आम्ही विरोधी बाकावर बसण्यासही तयार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.