शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे – रामदास आठवले

172

मुंबई – शिवसेना आणि भाजप यांच्या मुख्यमंत्री पदावरून कुरघोडी सुरु असताना रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केले आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार करावा. कारण भाजप अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी सहमती दर्शवेल असे मला नाही वाटत. यामुळे शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री होऊ द्यावे असे रामदास आठवले म्हणाले. दरम्यान दोन्ही पक्षांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे अशी शिवसेनेची मागणी आहे.

मुख्यमंत्री पदासाठी निश्चितच भाजपचा दावा

आठवले पुढे म्हणाले की, ”माझा फॉर्म्युला आहे की, भाजपा आणि शिवसेना एकत्रित यावे, कारण जनतेचा जनादेश त्यांच्यासोबत आहे. युतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. मात्र सत्तास्थापनेसाठी बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्री पदासाठी निश्चितच भाजपचा दावा आहे. कारण भाजपला जास्त जागा मिळाल्या आहेत.”

पुढील चार-पाच दिवसांत निर्णय होईल

आठवले म्हणाले की, ”मी दोन्ही पक्षांशी बोलेन आणि चर्चेद्वारे या मुद्द्याचे निराकरण करण्यास सांगेन. पुढील चार-पाच दिवसांत निर्णय होईल अशी मला आशा आहे.” विधानसभेत भाजपा-शिवसेना युतीला पूर्णपणे बहुमत मिळाले आहे. भाजपचे 105 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत.