मोदींच्या सभेसाठी ‘जुनी वृक्षवेली’ तोडणाऱ्यांचा निषेध

244

कडक कारवाई करण्याची काँग्रेस प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा  तिवारी यांची मागणी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेसाठी “स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील झाडांची कत्तल” करणाऱ्यांचा तीव्र निषेध व्यक्त करीत, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पत्रकाद्वारे केली. वास्तविक पंतप्रधानांच्या सभेस वहातूकीचे दृष्टीने ‘शहरा बाहेरील एसएसपीएमएस इ मैदान’ घेणे अपेक्षीत होते. पण ते न घेता मध्यवर्ती भागात वहातूकीस अडचण ठरणारे ‘एसपी कॉलेज’ अट्टाहासाने घेऊन,पुन्हा अडचणीची सबब सांगून, वर्षानु वर्षांची जुनी वृक्षे-झाडे तोडण्याची घटना अतिशय गंभीर व खेदजनक असून, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कॉंग्रेस पक्ष करीत असल्याचे ही तिवारी यांनी म्हटले आहे. ‘पंतप्रधानांनी मागील आठवड्यात दाखवलेले निसर्ग प्रेम खोटे आणि दिखाऊ असल्याचे’ या घटनेवरून सिद्ध झाले आहे. रातोंरात अंधारात ‘आरे जंगल तोडीची’ घटना असो, वा मुख्यमंत्र्यांच्या ‘रथासाठी सिंहगड रस्त्यावरील झाडे तोडण्याचे’ प्रकरण असो ,भारतीय जनता पक्ष मुजोरपणे वागत असून सर्रासपणे पर्यावरणीय नियमांची आणि निसर्गाची पायमल्ली करीत आहे, असे गोपाळ तिवारी यांनी म्हटले आहे. “स. प. महाविद्यालय” केवळ एका संस्थेपुर्ते मर्यादित नसून, एसपी चे मैदान ही पुण्याची देखील ओळख आहे, याचे भान ही संस्थाचालकांनी ठेवले पाहीजे.. महाविद्यालयीन आवाराचे निमित्तान् येथील झाडांच्या छायेखाली अनेक विद्यार्थी नित्य अभ्यास देखील करतात. पुणेकर नागरिक येथे फिरायला येतात. भाजपने ही झाडे तोडून त्यांची ‘सावली हिरावून घेतली आहे’. पुणेकरांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांची खुलेआम कत्तल करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी. शहरालगत अनेक मोठी मैदाने असताना मध्यवर्ती भागात शैक्षणिक संस्थेचे मैदान वापरने आणि तेथील वृक्षसंपदेवर घाला घालणे निषेधार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.