कोयत्याचा धाक दाखवून १८ लाख लुटले

153

पिंपरी – दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 18 लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना सांगवी येथे घडली. दुधाराम भैराराम देवासी (वय 27, रा. मारूंजी, ता. मुळशी) यांनी गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन दुचाकीवरील पाच चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास देवासी हे मार्केट यार्ड येथे 18 लाखांची रोकड घेऊन चालले होते. ते सांगवी येथील राजीव गांधी पुलाजवळ आले असता दोन दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी देवासी यांना कोयत्याचा धाक दाखविला. देवासी यांच्याकडील 18 लाखांची रोकड लुटून नेली, तसेच पाठलाग करु नये यासाठी दुचाकीची चावीही हिसकावून नेला. ऐवज लुटून आरोपी पुण्याच्या दिशेने पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम याबाबत अधिक तपास करीत आहेत.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार या रक्‍कमेचा मालक हा राजस्थान येथे होते. त्यांनी पुण्यात येऊन जमा रक्‍कमेचा हिशोब व शहानिशा केल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे घटना घडल्यानंतर तब्बल बारा दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.