8 मतदार संघातून 46 जणांचे अर्ज; शिवसेनेच्या दोघांची बंडखोरी

7

पुणे – शहरातील आठही मतदार संघात जवळपास सर्वच उमेदवारांनी वाजत गाजत, कार्यकर्त्यांना घेऊन, रॅलीद्वारे शक्‍तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. या सर्व मतदार संघात गुरुवारी एका दिवसांत 46 जणांनी अर्ज दाखल केले. काहींनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्याने एकूण 66 अर्ज आठही मतदार संघात भरण्यात आले. यामध्ये शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांनी बंडाळी करत अर्ज दाखल केले.

कसबा, कोथरूड, पर्वती, हडपसर, शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट, वडगावशेरी, खडकवासला या 8 विधानसभा मतदार संघात एका दिवसांत सुमारे 46 जणांनी अर्ज दाखल केले. 27 सप्टेंबरपासून ते 4 ऑक्‍टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याला मुदत देण्यात आली आहे. 28 तारखेला अमावस्या आणि पितृपंधरवड्याची समाप्ती होती. त्यामुळे अर्ज दाखल करण्यात आले नाहीत. शिवाय 29 तारखेला रविवार असल्याने आणि 2 ऑक्‍टोबरला सार्वजनिक सुटी असल्याने अर्ज दाखल झाले नाहीत. मात्र, 1 ऑक्‍टोबर रोजी काहीजणांनी अर्ज दाखल केले आहेत.

मुळात प्रमुख पक्षांच्या याद्या या दोन दिवसांत जाहीर झाल्या आहेत. अद्यापही काही ठिकाणची काही पक्षाची अंतीम यादी जाहीर झाली नाही. शुक्रवारीही (दि. 4) अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत आहे. काही उमेदवारांनी गुरुवारी डमी अर्ज दाखल केला असून, शुक्रवारी ते आणखी एकदा अर्ज दाखल करणार आहेत.

शहरातील 8 विधानसभा मतदार संघातील कसबा मतदार संघात भाजपकडून महापौर मुक्‍ता टिळक, महापालिकेतील कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे हे आघाडीतर्फे आणि शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. कोथरूड विधानसभा मतदार संघात महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तसेच, मनसेकडून किशोर शिंदे यांनी डमी अर्ज दाखल केला आहे. ते शुक्रवारी आपला अर्ज दाखल करतील.

खडकवासला मतदार संघात युतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी अर्ज दाखल केला. याशिवाय शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश कोंडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. वडगावशेरी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांनी भाजपतर्फे अर्ज दाखल केला.

पर्वती विधानसभा मतदार संघात भाजपकडून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी अर्ज दाखल केला. तर हडपसर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी भाजपकडून आणि मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात भाजपकडून नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, कॉंग्रेसकडून दत्तात्रय बहिरट आणि आपकडून मुकुंद किर्दत यांनी अर्ज दाखल केले आहेत. कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसकडून रमेश बागवे आणि युतीकडून नगरसेवक सुनील कांबळे यांनी अर्ज दाखल केला.