उमेदवारांची कोट्यावधींची मालमत्ता

7

जगदीश मुळीक अब्जाधीश
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार जगदीश मुळीक यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता 147 कोटी 63 लाख रुपये एवढी आहे. यामध्ये 3 कोटी 20 लाख 41 हजार 823 रुपयांची मालमत्ता ही जंगम मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील बरीचशी रक्‍कम विविध बॅंकांमध्ये ठेवींच्या स्वरुपात ठेवण्यात आली आहे. पत्नीच्या नावे बॅंकेत 34 लाख 81 हजार 435 रुपये आहेत. मुळीक यांच्याकडे 257.72 ग्रॅम सोने असून, त्याची अंदाजे किंमत 9 लाख 10 हजार रुपये एवढी आहे. पत्नीकडे 210.12 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 7 लाख 35 हजार रुपये दर्शविली आहे. तर स्थावर मालमत्ता ही 144 कोटी 42 लाख 49 हजार 848 रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. यात वडगावशेरी, वाघोली येथील शेत जमिनीचा समावेश करण्यात आला आहे. मुळीक यांनी शेती आणि व्यापार (बांधकाम व्यवसाय आणि जाहिरात फलक) हा उत्पन्न स्त्रोत दाखवला आहे. कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसल्याचीही माहिती त्यांनी यामध्ये नमूद केली असून, तसे प्रमाणपत्रही जोडले आहे.

भीमराव तापकीर यांची 30 कोटी 75 लाखांची मालमत्ता
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भीमराव धोंडीबा तापकीर यांच्यासह कुटुंबाची एकूण मालमत्ता तब्बल 30 कोटी 75 लाख 17 हजार रुपये इतकी आहे. त्यामध्ये वैयक्तीक भीमराव तापकीर यांची 24 कोटी 62 लाख 45 हजार रुपये मालमत्ता आहे. त्यामध्ये स्थावर मालमत्ता अधिक असून, 1 कोटी 38 लाख 88 हजार इतकी आहे. जंगम मालमत्ता 46 लाख तर वडिलोपार्जित मालमत्ता 2 कोटी 33 लाख 58 हजार आहे. खरेदी केलेली आणि स्वसंपादित मालमत्ता अशी एकूण 20 कोटी 42 लाख 94 हजार इतकी आहे. त्यामध्ये घर, दुकाने, जमीन यांचा समावेश असून, दहा लाखांचे सोने-चांदी आहे. पत्नीची मालमत्ता 4 कोटी 29 लाख 91 हजार 641 असून, मुलगा रोहितच्या नावावर 1 कोटी 82 लाख 79 हजार रुपयांची मालमत्ता आहे.

माधुरी मिसाळ यांच्याकडे 88 कोटी 84 लाखांची संपत्ती
पर्वती विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे आपल्या संपत्तीचे विवरण पत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यावरून मिसाळ यांच्याकडे एकूण 88 कोटी 84 लाख 6 हजार 615 रुपयांची संपत्ती असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या विवरण पत्रानुसार माधुरी मिसाळ यांच्याकडील एकूण संपत्तीत जंगम मालमत्ता 33 कोटी 48 लाख 93 हजार 779 आहे तर, 55 कोटी 35 लाख 12 हजार 836 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. गेल्या निवडणुकीत मिसाळ यांच्याकडे 72 कोटी 57 लाख 14 हजार 472 रुपयांची संपत्ती होती. मिसाळ यांच्यावर 6 कोटी 45 लाखांचे कर्ज आहे. त्याचप्रमाणे मिसाळ यांचा लवासामध्ये बंगला असून त्यांच्याकडे 45 लाख 53 हजार रुपये किमतीची बीएमडब्ल्यू कार आहे. तसेच 1 कोटी 80 लाख 92 हजार 203 रुपयांचे सोने व हिऱ्यांचे दागिने आहेत, असेही विवरण पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सिद्धार्थ शिरोळे, दत्ता बहिरट कोट्यधीश
शिवाजीनगरमधील भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांची एकत्रित मालमत्ता 8 कोटी 82 लाख 27 हजार रुपयांची असल्याचे प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. प्रगतशील शेतकरी अशी ओळख असलेले कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांची आणि पत्नीची एकत्रित मालमत्ता तब्बल 62 कोटी 73 लाख रुपये आहे. त्यामध्ये शेत जमिनीसह ग्रीन हाउस, ट्रॅक्‍टर, जेसीबी, सोने याचाही समावेश आहे. बहिरट यांची 46 कोटी 95 लाख 52 हजार 500 रुपयांची स्थावर तर 1 कोटी 37 लाख 46 रुपयांची जंगम अशी एकूण 48 लाख 32 हजार 67 हजार 127 रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावाने 13 कोटी 69 लाख 50 हजार स्थावर तर 71 लाख 64 हजार 500 जंगम मालमत्ता आहे. बहिरट यांच्या नावाने निघोजे गाव येथे 28 कोटी 86 लाख रुपयांची शेत जमीन तर पत्नीच्या नावाने पांढरेवाडी आणि निघोजे येथे 13 कोटी 70 लाख रुपयांची जमीन आहे. यामध्ये दोघांच्याही नावाने हरितगृह आहे.

दीप बंगला चौकात 15 कोटी 34 लाख 90 हजार रुपये किंमत असलेली इमारत आहे. बहिरट यांच्या नावाने 1 कोटी 38 लाखाच्या जंगम मालमत्तेत 66 लाख 50 हजार रुपयांचे सोने आहे. तर 30 लाखाची रोख आहे. तर पत्नीकडे 34 लाख 20 हजाराचे सोने तर 10 लाखांची रोख आहे. शिरोळे यांची स्थावर मालमत्ता 7 कोटी 62 लाख 13 हजार 3415 आहे. त्यात मुळशीतील रिहे गाव आणि उरळीकांचन येथे शेत जमीन आहे. तर पुण्यात व्यवसायिक इमारत आहे. 92 लाख 18 हजाराच्या जंगम मालमत्तेत 76 लाख 25 हजार रुपयांची ऑडी चारचाकी आहे. तसेच सोने आहे. त्यांच्या पत्नीच्या व मुलांच्या नावाने स्थावर मालमत्ता नाही. परंतु पत्नीकडे 8 लाख 6 हजार, पहिल्या मुलाच्या नावावर 8 लाख 6 हजार तर दुसऱ्या मुलाच्या नावावर 11 लाख 3 हजाराची जंगम मालमत्ता आहे. यात सोने आणि रोकडचा समावेश आहे.

मुक्ता टिळक यांची 2 कोटी 33 लाखांची मालमत्ता
कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 2 कोटी 33 लाख रुपयांची मालमत्ता तर पतीच्या नावे 4 कोटी 81 लाख रुपयांची मालमत्ता आहे. उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती नमूद केली आहे. टिळक यांच्याकडे रोख रक्‍कम 80 हजार रुपये तर पतीकडे 25 हजार रुपये आहेत. टिळक यांच्याकडे 45 तोळे सोने, 14 किलो चांदी आणि चार कॅरेटचे हिरे आहेत. या दागिन्यांची एकूण किंमत 26 लाख रुपये इतकी आहे. पतीच्या नावे दोन चारचाकी वाहने तर एक दुचाकी आहे. टिळक यांच्याकडे जमीन, सदनिका या स्थावर मालमत्ता असून त्याची किंमत 1 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. तर पतीच्या नावे 4 कोटी 13 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. पतीच्या नावे व्यावसायिक कर्ज असून त्याची किंमत 21 कोटी रुपये इतकी आहे. तर वाहन कर्ज 4 लाख रुपयांचे असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

विशाल धनवडे यांची 1 कोटी 40 लाखांची मालमत्ता
कसबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विशाल धनवडे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला आहे. धनवडे यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 1 कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता तर पत्नीकडे 41 लाख 90 हजार रुपयांची मालमत्ता आहे. धनवडे यांच्याकडे 50 हजार रुपयांची रोख रक्‍कम तर पत्नीकडे 20 हजार रुपयांची रोख रक्‍कम आहे. धनवडे यांच्याकडे 10 तोळे सोने तर पत्नीकडे 35 तोळे सोने असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

अरविंद शिंदे यांची 11 कोटींची मालमत्ता
कसबा विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 11 कोटी 6 लाख 11 हजार रुपयांची तर पत्नीच्या नावे 88 लाख 65 हजार रुपयांची मालमत्ता आहे. शिंदे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. शिंदे यांच्याकडे रोख रक्‍कम 49 हजार रुपये तर पत्नीकडे 15 हजार रुपयांची रक्‍कम आहे. विविध बॅंकांमध्ये शिंदे यांच्या मुदतठेवी असून त्याची रक्‍कम 22 लाख 75 हजार रुपयांची आहे. तर पत्नीकडे 2 लाख 14 हजार रुपयांच्या मुदतठेवी आहेत.

हॉटेलसह विविध संस्थांमध्ये 47 लाख 90 हजार रुपयांची गुंतवणूक असून पत्नीच्या नावे 18 लाख 60 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. शिंदे यांच्याकडे 5 लाख 12 हजार रुपयांची पोलोही कार आणि 3 लाख 14 हजार रुपयांची दुचाकी आहे. शिंदे यांच्याकडे 50 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 1 लाख 94 हजार रुपये आहे. तर पत्नीकडे 200 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 7 लाख 76 हजार रुपये इतकी आहे. रासे, शेलगाव आणि लोहगाव येथे एकूण 5 एकर 18 गुंठे इतकी शेत जमीन आहे. तर पुणे स्टेशन आणि ताडीवाला रोड येथे एकूण 5 हजार 810 चौरस फुटांच्या सदनिका आहे. तर पत्नीच्या नावे औंध येथे 6 हजार 914 चौरस फुटांची सदनिका असून त्याची किंमत 60 लाख रुपये इतकी आहे. तर शिंदे यांच्या नावावर 85 लाख 99 हजार रुपयांचे कर्ज आहे. शिंदे यांचे शिक्षण बी.कॉम झाले असून त्यांचा व्यवसाय शेती आणि हॉटेल असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

योगेश टिळेकर यांच्याकडे पावणेआठ कोटींची मालमत्ता
योगेश टिळेकर यांच्याकडे 7 कोटी 92 लाख 49 हजार 500 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे योगेश टिळेकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर जंगम मालमत्ता ही 49 लाखांच्या आसपास आहे. टिळेकर यांच्यावर 11 लाख 51 हजार 261 रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय 99 हजार 434 रुपयांची रोकड आहे तर, 2 लाख 90 हजार रुपयांचे दागिने आहेत. त्याचबरोबर याच मतदार संघातील मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांची स्थावर मालमत्ता 3 कोटी 45 लाख 56 हजार 686 इतकी आहे तर, जंगम मालमत्ता ही सुमारे 3 कोटी 39 लाख 41 लाख 460 रुपये इतकी आहे. याशिवाय मोरे यांच्याकडे विदेशी बनावटीच्या बाईक सुद्धा आहेत.

रमेश कोंडे यांची 5 कोटी 45 लाख 51 हजारांची मालमत्ता
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश अनंदराव कोंडे यांची एकूण मालमत्ता 5 कोटी 39 लाख 51 हजार 234 रुपये इतकी आहे. तर 54 लाख 15 हजार 771 रुपयांचे बॅंक कर्ज असल्याचे कोंडे यांनी संपत्ती विवरणपत्रात दिले आहे. त्यामध्ये वडिलोपार्जिंत मालमत्ता 1 कोटी 71 लाख 75 हजार इतकी आहे. रमेश कोंडे यांची जंगम मालमत्ता 89 लाख 25 हजार तर त्यांच्या पत्नी रुपाली कोंडे यांची 6 लाख रुपये आहे. स्थावर मालमत्ता ही 82 लाख 50 हजार आहे. तसेच खरेदी, स्वसंपादीत यासह अन्य मालमत्ता 2 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

रमेश बागवे यांची 6 कोटींची मालमत्ता
कॉन्टोन्मेंट मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्याकडे एकूण पाच कोटी 83 लाख 720 रूपये इतकी मालमत्ता आहे. यापैकी जंगम मालमत्ता एक कोटी, पाच लाख तीन हजार 996 इतकी आहे तर स्थावर मालमत्ता 4 चार कोटी 67 लाख इतकी आहे. तर बागवे यांच्या पत्नी जैनब बागवे यांच्या नावे सुमारे चार कोटी 47 लाख 67 हजार 821 इतकी मालमत्ता आहे. बागवे यांच्याकडे 134 तोळे सोने असून त्यांच्या पत्नीकडे 100 तोळे सोने आहे. बागवे यांच्या नावावर सुमारे चार लाखांचे वाहन कर्ज असून, तेरा लाख किंमत असलेली इनोव्हा हे वाहन आहे. त्यांच्यावर तीन फौजदारी खटल्यांची नोंद आहे.