मनसेची पहिली यादी जाहीर

22

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या २७ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात मंत्रालयात विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांच्यासह आजी-माजी आमदार आणि नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र या यादीत माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांची नावे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र धर्मा पाटील यांना सिंदखेडामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर प्रमोद पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून, प्रकाश भोईर यांना कल्याण पश्चिममधून, माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना माहीममधून उमेदवारी देण्यात आली आहे. या शिवाय मनसेच्या विद्यार्थी संघटनेचे नेते गजानन काळे यांना बेलापूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. कसबा पेठेतून मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, हडपसरमधून पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, कोथरूडमधून अॅड. किशोर शिंदे आणि शिवाजीनगरमधून सुहास निम्हण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मनसेचे पहिल्या यादीतील उमेदवार

प्रमोद पाटील – कल्याण ग्रामीण, प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम, अशोक मुर्तडक – नाशिक पूर्व, संदीप देशपांडे – माहिम, वसंत मोरे – हडपसर, किशोर शिंदे – कोथरुड, नितीन भोसले – नाशिक मध्य,राजू उंबरकर – वणी, अविनाश जाधव – ठाणे, नयन कदम – मागाठाणे, अजय शिंदे – पुणे कसबा पेठ, नरेंद्र धर्मा पाटील – सिंदखेड, दिलीप दातीर – नाशिक पश्चिम, योगेश शेवेरे- इगतपुरी, कर्णबाळा दुनबळे – चेंबूर, संजय तुर्डे – कलिना, सुहास निम्हण – शिवाजीनगर, गजानन काळे – बेलापूर, अतुल बंदिले – हिंगणघाट, प्रशांत नवगिरे – तुळजापूर, राजेश वेरुणकर – दहीसर, अरुण सुर्वे – दिंडोशी, हेमंत कांबळे – कांदिवली पूर्व, वीरेंद्र जाधव – गोरेगाव, संदेश देसाई – वर्सोवा, गणेश चुक्कल – घाटकोपर पश्चिम आणि अखिल चित्रे- वांद्रे पूर्व.