ऐन नवरात्रीत गॅस सिलिंडरची टंचाई

205

पिंपरी – गॅस कंपन्यांकडून सिलिंडरचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात गॅसटंचाई निर्माण झाली आहे. नवरात्रोत्सवाला अवघे काही तास उरले असताना नोंदणी करूनही तब्बल पंधरा दिवसांपासून सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. सिलिंडर मिळविण्यासाठी गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. पंधरा दिवस बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक आणि गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोज वाद होत आहेत. दरम्यान टंचाई दूर होऊन गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान दहा दिवस लागतील असा अंदाज वितरकांनी व्यक्‍त केला आहे.

ओएनजीसीच्या उरणमधील प्रोसेसिंग प्लान्टला 3 सप्टेंबर रोजी भीषण आग लागली होती. तेव्हापासून प्रकल्पातील गॅस उत्पादन थंडावले आहे. तेथून वाई येथील प्रकल्पासाठी लिक्‍विड गॅस उपलब्ध होतो. वाईतील प्लान्टमध्ये प्रोसेसिंग करून सिलिंडरमध्ये गॅस भरला जातो. तेथून पिंपरी चिंचवड शहराला हे सिलिंडर पाठवले जातात. उरण येथून लिक्‍विड गॅस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. मात्र यामुळे नागरिक अक्षरश: गॅसवर आहेत.

एकीकडे शासन उज्ज्वला योजनेतून घर तेथे गॅस कनेक्‍शन पुरवत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या तुटवड्याने ग्राहक गॅस वर असल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवडमधील गॅस वितरकांना दररोज 350 ते 400 सिलेंडरचे वितरण करावे लागते. परंतु मुंबईतील उरण येथील रिफायनरीतील आगीच्या दुर्घटनेमुळे केवळ 100 ते 150 सिलेंडर उपलब्ध होत असून प्रतीक्षा यादीप्रमाणे वितरण केले जात असल्याचे वितरकांनी सांगितले. शहरातील गॅस कंपनीच्या गोडाऊनमध्येही सिलेंडरसाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. गॅस न मिळाल्यास वादवादी होत आहे. टंचाईने ग्राहक हैराण झाले आहेत. गृहिणींचे व्यवस्थापन कोलमडले आहे.

प्रतीक्षा यादीत नाव नोंदवूनही सिलिंडर वाटपात वशिलेबाजी सुरू आहे. वितरकांनी सिलिंडर वितरण पारदर्शकतेने करावे, अशी मागणी संतप्त ग्राहकांमधून होत आहे. सिलिंडरची प्रतीक्षा यादी वाढली असतानाच काळा बाजारही तेजीत आहे. सिलेंडरचा जोड नसलेल्या व्यक्‍तींना 150-200 रुपये अधिकचे देऊन काळ्या बाजारात गॅस सिलिंडर उपलब्ध होत आहे. तितकेच पैसे भरून सिलेंडर वितरकांकडून त्वरित सिलिंडर दिला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

वितरकांसमोरही अडचणींचा डोंगर – शहरातील गॅस टंचाईमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असतानाच गॅस वितरकांपुढेही विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत. वितरकांना होणारा सिलिंडरचा पुरवठा कमी झाला आहे; तसेच उपलब्ध गॅस ग्राहकांपर्यंत पोहचवण्यातही वितरकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील पाऊस, रस्त्यांवरील खड्डे, मेट्रोचे सुरू असलेले काम यामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी यामुळे वितरकांकडील सिलिंडर पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावर परिणाम होत आहे. पूर्वी एक व्यक्ती दिवसात 80 सिलिंडर पोहोचवत असल्यास आता त्यांना जेमतेम 70 सिलिंडर पोहोचवणे शक्‍य होत आहे. सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांचा आपल्याला रोष सहन करावा लागत असल्याचे वितरकांनी म्हटले आहे