नदीपात्रातील चारचाकींचा मोर्चा पेठांतील रस्त्यांवर

66

पुणे  – गेल्या दोन महिन्यांत पावसामुळे मुठा नदीला अनेकदा आलेल्या पुरात पात्रालगतच्या रस्त्यांवर पार्क केलेली अनेक चारचाकी वाहने बुडाली. खडकवासला धरणातून वाढविण्यात येणाऱ्या विसर्गाचा धसका या वाहनचालकांनी घेतला असून वाहने सुरक्षित ठेवण्यासाठी आपला मोर्चा नदीलगतच्या पेठांमधील रस्त्यांकडे वळविला आहे. त्यामुळे या भागांत चारचाकीच्या रांगा दिसत असून, इतरांना मात्र नाहक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला धरणाच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने ही धरणे भरली आहेत. त्यामुळे या धरणांतून अनेकदा मोठ्या प्रमाणावर मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. पुणे डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुणेकरांना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्याची माहिती फारशी लवकर समजत नाही.

दरम्यान, अनेक सोसायट्यांमध्ये जागा उपलब्ध नसल्याने मुठा नदीपात्रालगतच्या रस्ता पुणेकरांसाठी हक्काचे वाहनतळ समजला जातो. मात्र, पावसाळ्यात बऱ्याचदा नदीपत्रालगतचे रस्ते पाण्याखाली येत असल्याचा पुणेकरांचा अंदाज फोल ठरवत या कालावधीत चार ते पाचवेळा भिडे पुलाबरोबरच हे रस्ते पाण्याखाली आले. त्यामुळे या हक्‍काच्या वाहनतळामधील अनेक चारचाकी वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी शिरल्याने ही वाहने नादुरुस्त झाली. या दुरुस्तीसाठी वाहनमालकांना हजारो रुपये मोजावे लागले. आता कोणत्याही क्षणी नदीपात्रातील विसर्ग वाढविल्यानंतर वाहन पाण्याखाली जाण्याची धास्ती या वाहनचालकांनी घेतली आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या पेठांमधील रस्त्यांवर वाहने उभी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे पेठांमधील रस्ते वाहतुकीसाठी अरुंद होत असून, नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे

.