राष्ट्रपतींच्या हस्ते आर्मी एअर डिफेन्सचे “कलर्स टू कॉर्प्स सन्मान प्रदान

55

नवी दिल्ली  – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज ओदिशाच्या गोपालपूर येथे “आर्मी एअर डिफेन्सचे कलर्स टू कॉर्प्स’ सन्मान प्रदान केले. यावेळी राष्ट्रपतींनी आर्मी एअर डिफेन्सच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या बलिदानामुळेच भारताचे सार्वभौमत्व सुरक्षित आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

सैन्य दलांमुळेच राष्ट्राचा गौरव वाढतो आणि आपल्या जनतेचे संरक्षण होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. अत्यंत विपरीत परिस्थतीत आणि प्रतिकूल हवामानात देशाच्या सीमांचे चिवटपणे संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गोपाळपूर मिलिटरी स्टेशन येथे सैन्याच्या हवाई संरक्षण दलाच्यावतीने आर्मी एअर डिफेन्स सेंटरने राष्ट्रपतींचे “कलर्स’ सन्मान स्वीकारला.

सर्वसाधारणपणे भारतीय सैन्य दलांचे आणि विशेषतः सैन्याच्या हवाई संरक्षण दलाचे देशाचे ऐक्‍य, अखंडता आणि सार्वभौमत्व यांचे संरक्षण करण्याचा गौरवशाली वारसा आहे, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

आम्ही सर्व प्रकारच्या प्रतिकारांविरूद्ध आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे. मला खात्री आहे की आम्ही हे व्रत पूर्ण करू आणि आपल्या देशाचे आणि आपल्या लोकांचे सन्मान अबाधित ठेवू, कलर्स हेच सूचित करतात, असेही राष्ट्रपती म्हणाले.