डेक्‍कन, नवीपेठचा पाणीपुरवठा आजपासून सुरळीत

132

पुणे – आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे पर्वतीमधून नवी पेठ तसेच डेक्‍कन भागाला पाणीपुरवठा करणारी 24 इंच व्यासाची जलवाहिनी वाहून गेली होती. ही जलवाहिनी अवघ्या 48 तासांत महापालिकेकडून दुरूस्त करण्यात आली असून शनिवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. याशिवाय येवलेवाडी परिसराला पाणीपुरवठा करणारी हडपसर येथील 18 इंच व्यासाची जलवाहिनीचे कामही शेवटच्या टप्प्यात आहे.

जलवाहिनी दांडेकर पूल येथून आंबिल ओढ्यावरून पुढे मांगीर बाबा मंदिरासमोरून जोडण्यात आली होती. मात्र, पुरात ही जलवाहिनी वाहून गेली. परिणामी या जलवाहिनीतून शास्त्री रस्ता, नवी पेठ, भांडारकर रस्ता, डेक्‍कन, कर्वेरस्ता, पुलाची वाडी तसेच शिवाजीनगरच्या काही भागांस करण्यात येणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे महापालिकेकडून नवीन वाहिनी टाकण्याचे काम गुरुवारी सकाळी तातडीने हाती घेतले. त्यात ही नवीन वाहिनी पूर्णत: बायपास करण्यात आली असून ती पुन्हा ओढ्यातून न घेता, दांडेकर पुलाच्या पदपथावरून घेण्यात आली आहे. ही नवीन वाहिनी सुमारे 100 मीटर व्यासाची आहे. या वाहिनीचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. त्यानंतर या वाहिनीची चाचणीहि घेण्यात आल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.