मसूद अझहर, हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांवर कारवाई करा

84

अमेरिकेने दिली पाकिस्तानला चेतावणी

वॉशिंग्टन : पाकिस्तानमध्ये वावर असणाऱ्या दहशतवाद्यांवरून अमेरिकेने पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तानने सुरूवातीला हाफिज सईद आणि मसूद अझहर यासारख्या दहशतवाद्यांविरूद्ध कडक कारवाई केली पाहिजे असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी अगोदर पाकिस्तानने सीमेवरील घुसखोरी नियंत्रणात आणावी असे अमेरिकेने पाकिस्तानला खडसावून सांगितले. संयुक्‍त राष्ट्रसभेच्या 74 व्या अधिवेशनात अमेरिकेने पाकचा चांगलाच समाचार घेतला.

अमेरिकेतील दक्षिण आणि मध्य आशियाई मुद्यांचे कार्यवाहक सहाय्यक मंत्री एलिस वेल्स यांनी महासभेच्या अधिवेशनात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. अध्यक्ष ट्रम्प यांनी काश्‍मीरबाबत मध्यस्थी करण्याची ऑफर दिली आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी परिस्थिती स्पष्ट केली असून काश्‍मीरबाबत मध्यस्थी नको असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्याबरोबर स्वतंत्र बैठकीतही स्पष्टपणे सांगितले आहे की दोन्ही नेते हवे असल्यास ते मध्यस्थी करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी रचनात्मक चर्चेची अमेरिकेला अपेक्षा असल्याचे एलिस म्हणाले. तसेच पाकिस्तानने “सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरी आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत देण्याच्या विरोधात पाकने गंभीर पावले उचलावीत अशीही अमेरिकेची इच्छा आहे. यामध्ये हाफिज आणि मसूदसारख्या दहशतवाद्यांवर कारवाईचा समावेश असल्याचे एलिस यांनी म्हटले.