एमआरडीसीच्या रिंगरोडला विशेष महामार्गाचा दर्जा

325

पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) पश्‍चिम भागातील रिंग रोडला शासनाने विशेष राज्य महामार्ग 1 असा दर्जा दिला आहे. याबाबतची अधिसूचना शासनाकडून काढण्यात आली आहे. समृद्धी महामार्गानंतर “विशेष महामार्गाचा दर्जा मिळालेला हा राज्यातील दुसरा महामार्ग आहे. हा रिंगरोड पुणे-सातारा महामार्गावरील केळवडे (ता.भोर) या गावापासून सुरू होणार असून उर्से (ता. मावळ) येथील पुणे -मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडणार आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंगरोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेला रिंगरोड 2007 पासून प्रादेशिक विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आला होता. ऑगस्ट 2011 मध्ये शासनाने एमएसआरडीसीच्या रिंगरोडला मान्यता दिली. शासनाकडून रिंगरोडच्या अंमलबजावणीसाठी एमएसआरडीसी नियुक्‍ती करण्यात आली. या सर्व प्रक्रियेदरम्यान एमएसआरडीसीसमोर अनेक अडथळे आले. त्यामुळे प्रादेशिक विकास आराखड्यातील प्रस्तावित रिंगरोडऐवजी नव्याने रिंगरोडची आखणी एमएसआरडीकडून करण्यात आली.

नव्याने आखण्यात आलेल्या रिंगरोडच्या सर्वेक्षणाचे काम झाल्यामुळे तो राज्य सरकारच्या पायाभूत समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी या रिंगरोडला “विशेष राज्य महामार्गा’चा दर्जा देण्यात यावा, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठविण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून घेण्यात आला होता. त्यानुसार हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यास सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मान्यता देण्यात आली

आहे.

जिल्ह्यातून तालुक्‍यांच्या ठिकाणांना जोडणाऱ्या रस्त्यांना राज्य महामार्गाचा दर्जा दिला जातो. एमएसआरडीसीकडून पहिल्या टप्यात 66 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुणे-सातारा महामार्ग येथून निघणारा हा रिंगरोड पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. या रस्त्यास विशेष राज्य महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे तो विकसित करण्यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

असा असणार महामार्ग
केळवडे-कांजळे-खोपी-कुसगाव-रांजे (ता.भोर)- रहाटावडे-कल्याण- घेरा सिंहगड- खामगाव मावळ-वरदाडे-मालखेड-मांडवी बुद्रुक-सांगरुण-बहुली (ता. हवेली)- कातवडी-मुठा-मारणेवाडी-आंबेगाव-उरावडे- कासारअंबोली-भरे-अंबडवेट-घोटावडे-रिहे-पडळघरवाडी-जावळ-केमसेवाडी-पिंपळोली (ता.मावळ)-पाचाणे-चांदखेड-बेबडओहोळ-धामणे-परंदरवाडी- उर्से (ता.मावळ).