सणासुदींच्या पार्श्वभूमीवर फ्लिपकार्टकडून फिनटेक सेवेचा तिप्पट विस्तार

17

दुय्यम पातळीवरील आणि त्यापलिकडील बाजारपेठांमध्ये किफायतशीर वस्तू व सेवांचा लाभ पोहोचवण्यावर भर

सणासुदींच्या काळात नव्या ग्राहकांना अर्थपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी फ्लिपकार्ट पे लेटर आणि कार्डलेस क्रेडिट यांसारख्या सुविधांचा विस्तार

बंगळुरू, १७ सप्टेंबर २०१९ : भारताची सर्वात मोठी ई-कॉमर्स बाजारपेठ असलेल्या फ्लिपकार्टने आगामी सणासुदींच्या पार्श्वभूमीवर आपल्या फिनटेक सेवेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला असून यामुळे देशभरातील खरेदीदारांना अर्थपुरवठ्याचे आणि किफायतशीर वस्तू व सेवांचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. यापूर्वीच्या सणासुदींच्या तुलनेत यंदा फ्लिपकार्ट पे लेटर आणि कार्डलेस क्रेडिट यांसारख्या सेवांचा तिप्पट विस्तार फ्लिपकार्टने केला असून फॅशन, किराणा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू व उपकरणांसारख्या श्रेणींमध्ये वाढ साध्य करण्यासाठी ते महत्त्वाचे साधन ठरतील.

या विस्ताराच्या माध्यमातून नव्यानेच अर्थपुरवठ्याचा पर्याय निवडू इच्छिणाऱ्या विविध प्रांत आणि पिनकोड्सच्या ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना १५ कोटींहून अधिक उत्पादनांच्या खरेदीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे फ्लिपकार्टचे उद्दिष्ट आहे.

फ्लिपकार्ट पे लेटर आणि कार्डलेस क्रेडिट हे फ्लिपकार्टने आपल्या १६ कोटींहून अधिक ग्राहकांसाठी ऑनलाइन खरेदीचा अनुभव सुलभ आणि किफायतशीर करण्यासाठी स्वतः विकसित केलेल्या अर्थतंत्रज्ञान सेवा आहेत. फ्लिपकार्ट पे लेटरमुळे ग्राहकाला एका ठराविक मूल्यमर्यादेपर्यंत महिनाभर खरेदी करून महिनाअखेरीस एकत्र रक्कम अदा करण्याची सुविधा उपलब्ध होते. ‘बाय नाऊ पे लेटर’ सुविधेंतर्गत ग्राहकाला अतिरिक्त खर्चभाराशिवाय पाच हजार रुपयांपर्यंत अर्थबळ उपलब्ध होते. केवळ एका क्लिकवर त्वरित खरेदी आणि परतावा, अतिरिक्त खर्चभाराविना ४० दिवसांपर्यंत अर्थबळ आणि संपूर्ण महिन्यासाठी एकत्रित बिल अशा सुविधांमुळे खरेदीप्रक्रिया सुलभ होते.

कार्डलेस क्रेडिट सुविधेंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत खरेदी करून पुढील १२ महिने समान हप्त्याने रक्कम अदा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या ग्राहकांना अतिरिक्त खर्चभाराविना अर्थबळ उपलब्ध करून देण्यासाठी या पर्यायाचा स्वीकार फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या अनेक नामांकित ब्रँड्सने देखील केला आहे. संपूर्ण डिजिटल असलेल्या सुलभ केवायसी अर्ज प्रक्रियेद्वारे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. विविथ अर्थसंस्थांच्या सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टने अलिकडेच अॅक्सिस बँकेच्या भागिदारीत स्वतःची नाममुद्रा असलेल्या क्रेडिट कार्डची घोषणा केली आहे. फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी सणासुदींच्या काळात या क्षेत्रातील सर्वोत्तम पर्यायांपैकी हा पर्याय असून या भागिदारीमुळे आगामी बिग बिलियन डेज दरम्यान खरेदी करणाऱ्यांसाठी १० टक्के तात्काळ सवलत आणि ५ टक्के रक्कम परतावा मिळणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून अर्थपुरवठ्याची उपलब्धता वाढवून ग्राहकांची खरेदीक्षमता वाढवण्याचे फ्लिपकार्टचे उद्दिष्ट आहे.

यासंदर्भात फ्लिपकार्टच्या फिनटेक आणि पेमेंट समूहाचे प्रमुख रणजीत बोयानपल्ली म्हणाले, “आमच्या भागधारकांना अधिकाधिक मूल्यवृद्धीचा लाभ होण्याबरोबरच ग्राहकसेवेला केंद्रस्थानी ठेवून आम्ही प्रत्येक पाऊल उचलत असतो. देशाच्या अगदी दुर्गम भागातही अर्थपुरवठ्याचा लाभ पोहोचवून लाखो भारतीयांना कुठल्याही अतिरिक्त खर्चभाराविना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला आम्ही अधिक बळकट करत आहोत. अशा प्रकारचे उपक्रम व त्यांच्या विस्ताराच्या माध्यमातून बिग बिलियन डेजचा आमचा वायदा अधिक ग्राहकांपर्यंत नेऊन ‘भारता’ला अधिक प्राधान्य देऊन आमच्या अर्थपूर्ण वाढीला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

भारतातील अर्थपुरवठा परिसंस्था वेगाने वाढत असून विस्तार आणि स्वीकारासंदर्भात तिची क्षमता मोठी आहे. सिबिलच्या अंदाजानुसार सुमारे २२ कोटी भारतीय अर्थपुरवठ्यासाठी पात्र आहेत, परंतु अद्यापही त्यापैकी एक तृतियांश भारतीय अर्थसंस्थांकडून केल्या जाणाऱ्या अर्थपुरवठ्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत. याखेरीज केवळ ७.२ कोटी भारतीयच बँक अथवा प्रमुख वित्तीय संस्थेतील खात्यासह अर्थपुरवठ्याच्या संदर्भात सक्रिय आहेत. त्यांची वृद्धी आणि आकांक्षापूर्तीला चालना देण्यासाठी मदत करण्याबरोबरच इंडिया आणि भारत यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी यासंदर्भात सक्रिय मदत करण्याचे फ्लिपकार्टचे उद्दिष्ट आहे.