भाजपचं उपरणं पाहताच इंदुरीकर महाराजांनी का लावले कानाला हात? मुख्यमंत्रीही खळखळून हसले!

188

संगमनेर : संगमनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. एवढंच नाहीतर बाळासाहेब थोरातांच्या विरोधात भाजप इंदुरीकर महाराजांना तर विधानसभेच्या रिंगणात उभं करणार नाहीना, या चर्चेलादेखील ऊत आला आहे.

सध्याच्या राजकीय पक्षांतरावर टीका करण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी हे असं स्वतःचेच उदाहरण दिलं तर खरं पण आज तेच इंदुरीकर महाराज राजकीय पटलावर एकदम प्रकाशझोतात आले. निमित्त अर्थातच… संगमनेरमधील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं आहे. शुक्रवारी इंदुरीकर महाराज मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर जाताच सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. गर्दीमधूनही महाराजांच्या या आगंतुक उपस्थितील भलताच रिस्पॉन्स मिळाला. हाच चान्स साधून खासदार सुजय विखे तर लागलीच महाराजांचा भाजप प्रवेश उरकायला निघाले होते.

पण महाराजांनीच कानाला हात लावून वेळ मारून नेली. पण एवढा लोकप्रिय महाराज स्टेवर येतो म्हटल्यावर मुख्यमंत्री तरी ही संधी कशी सोडतील. त्यांनीही मग महाराजांना थेट शेजारीच बसवून कानगोष्टी सुरू केल्या. यावेळी दोघांमध्ये हास्यविनोदही रंगल्याचं बघायला मिळालं. पण इंदुरीकर महाराजांनी तुर्तास फक्त मुख्यमंत्री सहाय्य निधीचा चेक देण्यावरच निभावलं. नाहीतर सुजय विखेंनी इंदुरीकरांच्या भाजप प्रवेशाचा घाट घातल्यात जमाच होता. आता माहित नाही पुढे काय होतेय ते…पण यानिमित्ताने संगमनेरमध्ये इंदुरीकरांच्या भाजप उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण, तसंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात तगड्या उमेदवाराचा शोध सुरूच आहे.

या विधानसभेत विखेंनी संगमनेरमधून थोरातांना पाडण्याचा पुरता चंग बांधला. त्यामुळे इंदुरीकर महाराजांचा सारखा उमेदवार शोधून सापडणार नाही. म्हणूनच इंदुरीकरांसमक्षच विखेंनी लागलीच संगमनेरचा निकालही लावून टाकला.

दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी राजकारणात जाण्यात काहीच गैर नसल्याचं इतर महाराज मंडळींनी म्हटलंय.

आता भाजपच्या ह्या अशा खुल्या ऑफरवर स्वतः इंदुरीकर महाराज नेमका काय निर्णय घेतात हे अजून कळू शकलेलं नाही पण खरंच इंदुरीकर महाराज संगमनेरमधून विधानसभेला उतरले तर ही लढत नक्कीच रंगतदार होणार यात शंका नाही. कारण इंदुरीकरांच्या किर्तनांचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. बघुयात भाजप हे नेमकं कसं एनकॅश करतंय.