जिथे मोदी विकत होते चहा, त्या दुकानाबद्दल सरकारने घेतला खास निर्णय

35

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या वडनगर रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये याचा उल्लेख वारंवार केला आहे. आता याच दुकानाचं पर्यटनस्थळामध्ये रूपांतर होणार आहे.

केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी नुकतीच वडनगरला भेट दिली. ज्या ठिकाणी पर्यटन स्थळं विकसित करता येतील अशा ठिकाणांचा त्यांनी आढावा घेतला. प्रल्हाद पटेल यांनी वडनगर रेल्वे स्टेशनला जाऊन तिथे पर्यटन स्थळ विकसित करण्याची घोषणा केली.

एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, ही गोष्ट सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरून त्यांची खिल्ली उडवली होती. नरेंद्र मोदी हे एकविसाव्या शतकात कधीच पंतप्रधान बनू शकत नाहीत. त्यांना वाटलं तर ते AICC च्या अधिवेशनात चहा विकू शकतात, असं मणिशंकर अय्यर म्हणाले होते.याला नरेंद्र मोदींनी मात्र खूपच संयत प्रतिक्रिया दिली.

मणिशंकर अय्यर यांच्या टिकेचा हा मुद्दा मोदींनी प्रचारामध्ये महत्त्वाचा बनवला. भाजपने यानंतर चाय पे चर्चा ही मोहीमही सुरू केली.

प्रल्हाद पटेल यांनी या दुकानाची पाहणी केली. ही चहाची टपरी पत्र्याची आहे. याच्या खालच्या भागात गंज पकडला आहे. हा गंज आणखी वाढू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक चहावाला ते पंतप्रधान अशा प्रवासाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या ठिकाणाला भेट देऊन मोदींच्या या प्रेरक कहाणीबद्दल जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडेल.