विधानसभेची आचारसंहिता १३ सप्टेंबरला लागणार : रावसाहेब दानवे

42

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू झालेली असताना आता, या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता १३ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे विधान भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे केले आहे. शिवाय यासाठी आता केवळ १२ दिवसचं उरले असल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना तयारी लागण्यासही सांगितले आहे. जालन्यात ओबीसी समाजाच्या कार्यक्रमात संवाद साधताना त्यांनी माहिती दिली.

सध्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाचा अंदाज बांधून सर्वच पक्षांच्या इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याअगोदरच रावसाहेव दानवे यांनी आचारसंहितेच्या संभाव्य तारखेचा गौप्यस्फोट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दानवे यांच्या या विधानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधीत करताना, बारा दिवस बाकी आहेत. तोपर्यंत आमची महाजनादेश यात्रा चालणार आहे. यात्रा एकदा संपू द्या, तुमच्या मागण्या एकदा कागदावर आणा. जालन्यात बैठक घ्या, आम्हाला बोलवा आणि मागण्या समजावून सांगा. नाराज होऊ नका, असे दानवे म्हणाले. याचबरोबर राजकारणातही मराठा समाजाला ओबीसीचा दर्जा देण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले.

विशेष म्हणजे काही दिवस अगोदरच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही गणेशोत्सवानंतर आचारसंहिता लागणार असल्याचं भाकीत केलं होतं. १५ ऑक्टोबरच्या जवळपास विधानसभा निवडणुका होतील, असंही मुनगंटीवार म्हणाले होते. त्यामुळे आता खरचं गणेशोत्सवानंतर विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.