‘कुछ बडा होनेवाला है’ तरुणाच्या फोनने खळबळ

58

मुंबई : दिल्ली विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या दिल्ली येथील मुख्यालयात फोन करून ‘कुछ बडा होने वाला है’ असं सांगत एकच खळबळ उडवून दिली. या फोननंतर मुंबईत हायअॅलर्ट जारी करत सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याला मुंबईतून अटक केली आहे.

शुभमकुमार पाल असं या दिल्लीतील विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याला गोरेगाव येथील नेस्को, आयटी पार्क येथून अटक करण्यात आली आहे. शुभमने दिल्लीतील एनआयएच्या मुख्यालयात फोन केला होता. ‘बॉम्बे में कुछ बडा होनेवाला है, रोक सको तो रोक लो’, असं म्हणत त्याने हा फोन कट केला होता. त्याच्या या फोननंतर मुंबईत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला होता. त्याच्या फोननंतर पोलिसांनी गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, मॉल्स आणि लॉज आदी ठिकाणी शोध मोहीम राबवत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर त्याचा फोन ट्रेस झाल्याने त्याला गोरेगावच्या आयटी पार्कमधून ताब्यात घेतले. धमकीचा कॉल केल्याबाबत क्राईम ब्राँचने चौकशी केल्यानंतर शुभम समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तपास अधिकाऱ्यांनी त्याचा फोन तपासला. राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा फोन करण्यापूर्वी पाकिस्तानशी संबंधित किमान ११ वेबसाइट त्याने शोधल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला वनराई पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून त्याच्याविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम ५०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास डीसीपी (युनिट१) अकबर पठाण यांच्या पथकाने पूर्ण केला.